Dr. Amol Kolhe Sarkarnama
पुणे

Amol Kolhe's Announcement : डॉ. अमोल कोल्हेंची मोठी घोषणा; पुढची पाच वर्षे अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेणार

Vijaykumar Dudhale

Pune, 10 May : शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रश्न सोडविण्यासाठी, सर्वसामान्य जनतेला उपलब्ध राहण्याच्या दृष्टीने मी पुढील पाच वर्षे अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेणार आहे, अशी घोषणा शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे.

विरोधकांकडून विशेषतः अजित पवार आणि उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडून या मुद्यावरून अमोल कोल्हे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होत होता. मात्र, कोल्हे यांच्या ‘ब्रेक’ची घोषणा करून विरोधकांच्या आरोपांतील हवाच काढून घेतली आहे.

डॉ. अमोल कोल्हे हे शिरूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून (NCP) दुसऱ्यांदा लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे पुन्हा एकदा नशिब अजमावत आहेत.

या प्रचारात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कोल्हे यांनी अभिनय क्षेत्राला वेळ देण्यासाठी खासदारकीचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली होती, असा आरोप पवार यांनी केला. तसेच, उमेदवार आढळराव यांच्याकडून कोल्हेंवर याच मुद्यावरून वारंवार टीका होत होती. त्यामुळे कोल्हे यांच्या या घोषणेला विशेष महत्व आहे.

डॉ. कोल्हे म्हणाले, शिरूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी मी पाच वर्षे सांभाळली आहे. पुढची पाच वर्षे माझ्यावर जबाबदारी असेल. पुढच्या जबाबदारीच्या वेळी नक्कीच त्या दृष्टीने सर्वसामान्य जनतेला उपलब्ध राहण्याच्या दृष्टीने, मतदारसंघातील प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने ही गोष्ट होईल आणि मध्यंतरी जी राजकीय स्थित्यंतरे झाली. मी स्वतः लोकसभेची उमेदवारी करत असतानाही तब्बल सात ते आठ मतदारसंघात प्रचार केला. त्यामुळे जबाबदाऱ्या वाढत गेल्या आहेत. त्या जबादाऱ्यांना वेळ देणे गरजेचे आहे.

गेल्या पाच वर्षांत मी खरं तर एकच मालिका केलेली आहे. अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे अभिनय क्षेत्रात बिझी होते, हा विरोधकांकडून माझ्याबद्दल करण्यात येत असलेला धांदात अपप्रचार आहे. जनसंपर्क कमी होण्याबाबत काही वेगळी कारणं आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळी ही सर्व वेगळी कारणे जनतेच्या समोर येतील, असा इशाराही अमोल कोल्हे यांनी दिला.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील (Shirur Lok Sabha Constituency) प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मतदारसंघाला वेळ देणं गरजेचे आहे. त्यासाठी अभिनय क्षेत्रातून जरी ब्रेक घ्यावा लागला तरी माझी काही हरकत नाही. तो ब्रेक घ्यायला मी तयार आहे, असेही डॉ. अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT