Pune News : पुढील काही दिवसांमध्ये राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती केली जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. याबाबत महायुतीतील सर्व मित्र पक्षांमधील चर्चा अंतिम झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील नेत्यांकडून आपल्याला विधानसभेची आमदारकी मिळावी यासाठीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. याचबरोबर पक्षांतर्गत हेवेदावे देखील समोर आले आहेत. आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेत पुण्यातील राष्ट्रवादीच्या (NCP) पदाधिकाऱ्यांनी शहराध्यक्ष दीपक मानकर यांना विधान परिषदेची आमदारकी द्यावी अशी मागणी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरांमध्ये राज्यपाल नियुक्त आमदारकीवरून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये अंतर्गत कुरघोड्यांचं राजकारण पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना विधान परिषदेची आमदारकी मिळू शकते अशा चर्चा सुरू झाल्या होत्या यानंतर अजित पवार गटातील दुसऱ्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी मैदानात उतरत त्यांच्या नावाला विरोध दर्शवला होता.
एकाच व्यक्तीला पक्षांमध्ये खूप पद मिळत असल्याने रूपाली ठोंबरे पाटील यांनी नाराजी व्यक्त करत आपल्याला अथवा दुसऱ्या एखाद्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याला विधान परिषदेची आमदारकी मिळावी अशी मागणी यांनी केली होती. हा वाद नवीन असतानाच आता शहराध्यक्ष दीपक मानकर यांना विधान परिषद द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर आहेत यादरम्यान त्यांनी सकाळी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या या भेटीगाठी दरम्यान पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांकडे मानकरांसंदर्भात मागणी केल्याचं समोर आलं आहे.
यापूर्वी देखील विधानपरिषद आमदारकीसाठी देखील दीपक मानकर इच्छुक होते. तशी इच्छा त्यांनी बोलून दाखवली होती मात्र राजेश विटेकर यांना आमदारकी मिळाल्याने मानकर यांची संधी हुकली होती. मी गेल्या 20 वर्षांपासून पक्षात सक्रिय काम करत असल्याने दादा मला न्याय देतील अशी दीपक मानकर यांनी इच्छा व्यक्त केली आहे.
या दरम्यान राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी रूपाली चाकणकर यांचे नाव देखील चर्चेत होतं, मात्र एकाच महिलेला किती पद देणार असं म्हणत पक्षातूनच रूपाली चाकणकर यांच्या नावाला विरोध होत आहे. त्यामुळे मानकर यांची वर्णी लागणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे