Deputy CM Ajit Pawar speaks with J&K CM Omar Abdullah Sarkarnama
पुणे

Pahalgam Terror Attack: अजितदादांचा ओमर अब्दुल्लांना फोन; महाराष्ट्रातील पर्यटकांना मदत पुरवा!

Pahalgam Terror Attack Ajit Pawar Calls Omar Abdullah: महाराष्ट्रातील नागरिकांचे मृतदेह तातडीने राज्यात आणण्यासह जखमींना आवश्यक उपचार मिळावेत, तसेच पर्यटनस्थळी हॉटेलमध्ये अडकून पडलेल्या नागरिकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी सुध्दा अजित पवार यांनी सूचना दिल्या आहेत.

Sudesh Mitkar

Pune News, 23 Apr 2025 : पहलगाम (जम्मू-काश्मीर) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मिरमध्ये गेलेल्या राज्यातील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना राज्यात सुखरुप परत आणण्यासाठी राज्य सरकार ॲक्शन मोडवर काम करत आहे. जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट दूरध्वनीवरून संपर्क साधून महाराष्ट्रातील पर्यटकांना तातडीने आवश्यक ती मदत पुरवण्याची विनंती केली आहे.

प्रत्येक पर्यटकाला सुरक्षितपणे घरी परत आणून त्यांच्या कुटुंबांना दिलासा देणे, हीच प्राथमिकता असल्याचे अजित पवारांनी सांगितले आहे. तसेच पर्यटकांशी समन्वय साधण्यासह त्यांना आवश्यक मदतीसाठी मंत्रालयातील आपत्ती निवारण कक्षात विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. काश्मिरमध्ये अडकलेल्या पर्यटकांच्या नातेवाईकांनी घाबरुन जावू नये, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.

जम्मू आणि काश्मीरमध्ये अडकून पडलेल्या पर्यटकांना सुखरूप परत आणण्यासाठी केंद्र सरकार व जम्मू-काश्मीर प्रशासनाच्या यंत्रणांशी समन्वय साधून आवश्यक ती सर्व मदत मिळावी, यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशीही त्यांनी संपर्क साधून विशेष विमानसेवा उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू केले आहे. शक्य तितकी अधिक विमाने पाठवून पर्यटकांची जलद व सुरक्षित परतीची व्यवस्था करण्यात येणार आहे.

या संपूर्ण प्रक्रियेवर उपमुख्यमंत्री अजित पवार स्वतः लक्ष ठेवून आहे. राज्य व केंद्र सरकारी संबंधित यंत्रणांशी ते सातत्याने संपर्कात आहेत. राज्य शासनाने जिल्हा प्रशासन, पर्यटन विभाग आणि आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणांना सतर्कतेवर ठेवले आहे. परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांशी सुध्दा उपमुख्यमंत्री पवार यांनी दूरध्वनीवरुन संपर्क साधून त्यांना मदतीसह धीर दिला आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांचे मृतदेह तातडीने राज्यात आणण्यासह जखमींना आवश्यक उपचार मिळावेत, तसेच पर्यटनस्थळी हॉटेलमध्ये अडकून पडलेल्या राज्यातील नागरीकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी सुध्दा अजित पवार यांनी संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या आहेत.

राज्य सरकारने नागरिकांना घाबरून न जाता संयम राखण्याचे आवाहन केले आहे. पर्यटकांच्या कुटुंबीयांशी नियमित संपर्क साधून त्यांना वस्तुनिष्ठ व वेळोवेळी माहिती पुरवली जात आहे. पर्यटकांची यादी, त्यांच्या वास्तव्याच्या जागा आणि परतीच्या संभाव्य वेळापत्रकाची माहिती संकलित केली जात असून, ही संपूर्ण कार्यवाही समन्वयाने आणि जलदगतीने पार पाडण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाच्या नेत्या रूपाली ठोंबरे देखील जम्मू काश्मीरला गेल्या होत्या. आम्ही सर्वजण सुरक्षित आहोत, अडकलेल्या पर्यटकांना महाराष्ट्रात येण्याची तत्काळ सोय करावी अशी विनंती त्यांनी केली आहे. अजित पवार यांनी त्यांना फोन करुन त्यांची परिस्थितीची माहिती घेतली.

"मी माझ्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांशी बोलून आणि मुरलीधर मोहोळ यांच्याशी बोलून विमानाची सोय करून द्या अशी विनंती केली आहे. तातडीने सर्व मदत करून द्यावी, पर्यटकांना लवकरत लवकर बाहेर काढणं गरजेचं आहे," असंही ठोंबरे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT