Ajit Pawar
Ajit Pawar sarkarnama
पुणे

अजितदादांच्या इच्छेला राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेनेच लावला सुरूंग

भरत पचंगे : सरकारनामा

शिक्रापूर : महाआघाडी सरकारच्या पहिल्याच अधिवेशनात अर्थमंत्री म्हणून ज्या अजित पवारांनी (Ajit Pawar) वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळा राज्यात आदर्श ठरविली आणि त्याच शाळेच्या धर्तीवर राज्यातील १५०० शाळांसाठी ५ हजार कोटींची तरतूदही केली होती, त्याच शाळेवर सर्व पालक-विद्यार्थ्यांनी नुकताच बहिष्कार टाकला आहे.

विशेष म्हणजे, ज्या पुणे जिल्हा परिषदेवर दस्तुरखुद्द अजित पवार यांच्याच पक्षाची सत्ता आहे. त्याच जिल्हा परिषदेने या शाळेला संपविण्याचा डाव रचल्याचा आरोप पालकांनी पालकसभेत करुन शाळेवर बहिष्कार टाकल्याने पुणे जिल्ह्यासह राज्यातील शिक्षण क्षेत्रात मोठे आश्चर्य व्यक्त होत आहे. सन २०१२ मधील ३२ पटाची शाळा पुणे जिल्हा परिषदेच्या (Pune District) कुठल्याही मदतीशिवाय ५२१ पटाची करणे, स्विडनच्या शाळांशी विद्यार्थी आदान-प्रदान कार्यक्रम करीत ८ वेगळ्या शाळाबाह्य उपक्रमांनी जगात नावलौकीक मिळविण्याचे काम वाबळेवाडी (ता. शिरूर, जि. पुणे) येथील मुख्याध्यपाक दत्तात्रय वारे यांचेसह ग्रामस्थांनी केवळ आठ वर्षात करुन दाखविले.

याच कामाची दखल घेवून २०१६ मध्ये तत्कालीन देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सरकारने शाळेला आंतरराष्ट्रीय शाळेचा दर्जा देवून स्वतंत्र अभ्यासक्रम विकसीत करीत शाळेचे नाव स्व. अटलविहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा केले. २०१९ मध्ये सरकार बदलले तरी महाविकास आघाडी सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभा सभागृहात शाळेचा स्वतंत्र उल्लेख करीत सांगितले की, वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळा उच्च दर्जाची शाळा म्हणून नावारुपाला आलेली आहे.

त्याच धर्तीवर पुढील चार वर्षात राज्यातील सर्व शाळा आदर्श करणार असल्याचे पवार यांनी जाहीर केले. त्यासाठी ५ हजार कोटींची तरतूद अर्थसंकल्पात जाहीर केली. या शाळांमध्ये वाबळेवाडीच्या धर्तीवर स्मार्ट क्लासरुम, क्रिडा सुविधा, अध्ययन सुविधा, अत्याधुनिक क्रिडा सुविधा, सुसज्ज वाचनालय, इंटरनेट कनेक्टिव्हीटीसह शालेय संकुल तयार कराण्याचा मानसही पवार यांनी जाहीर केला होता. मात्र, गेल्या सव्वा वर्षात तसे काहीच झाले नाही. उलट शाळा आता बंद करण्याच्या स्थितीत येवून ठेपलेली आहे.

अजितदादांच्या इच्छेलाच जिल्हा परिषदेने लावला सुरूंग..!

हे सर्व होत असतानाच पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच्याच काही सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत शाळेविरोधात जोरदार आवाज उठवून लोकवर्गणीचा मुद्दा उपस्थित केला. लोकवर्गणी करुन आदर्श शाळा करण्याचा स्पष्ट अध्यादेश फडणवीस सरकारने देवूनही शाळेची चौकशी पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांनी सुरू केली.

शाळेचा मुख्य खांब असलेले मुख्याध्यापक यांची चौकशी सुरू केली व त्यांचे निलंबन केले. गंमत म्हणजे जुलै २०२१ मध्ये सुरू केलेली ही चौकशी आक्टोबर २०२२ असे तब्बल १५ महिने उलटले तरीही पूर्ण झाली नाही, अन कुठलेही आरोपही त्यांना सिध्द करता आलेले नाही. याच काळात ग्रामस्थांनी सीईओंच्या कार्यपध्दतीबद्दलच आक्षेप नोंदवून थेट प्रशासकीय अधिकारी नियुक्ती करणा-या डीपीटी (Departament of Personnel & Training) येथे केली. तेंव्हापासूनच शाळेतील काही शिक्षक, अंगणवाडी सेविका आणि ग्रामस्थ यांच्या चौकशीसाठीच्या नोटीसा सुरू झाल्या.

सीईओंचा तालुक्यात पाहुणचार होतो पण...

याबाबत अजित पवार यांचीही ग्रामस्थांनी काही दिवसांपूर्वी भेटी घेतली होती. मात्र, त्यांच्या पक्षाच्या सत्तेत असलेल्या पुणे जिल्हा परिषदेने मात्र दत्तात्रय वारे यांच्यानंतर ग्रामस्थांना टार्गेट करुन त्यांच्याही चौकशा सुरू केल्याने ग्रामस्थ हैरान आहेत. सव्वा वर्षांच्या काळात आणि त्यापूर्वी कधीच आयुष प्रसाद हे शिक्रापूरसह शिरुर तालुक्यात खुप वेळा येवून गेले.

शाळेच्या तक्रारदार असलेल्या एका जिल्हा परिषद सदस्यांच्या घरी पाहूनचारही घेवून गेले. मात्र, वाबळेवाडीकरांच्या तक्रारीबाबत ते एकदाही फिरकले न नसल्याने आणि शाळेतील अभ्यासक्रमा व्यतिरिक्त सर्व उपक्रम बंद झाल्याने पालक संतप्त होत ३०० पालकांच्या उपस्थितीतील पालकसभेत शाळा बंद करण्याचाच निर्णय सर्वांनी घेतला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT