BJP Coporator Vasant Boarate joins NCP
BJP Coporator Vasant Boarate joins NCP  Sarkarnama
पुणे

राष्ट्रवादीच्या गव्हाणेंचा दे धक्का! पाचच दिवसांत भाजपचा पहिला नगरसेवक फोडला

उत्तम कुटे: सरकारनामा ब्युरो

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील (PCMC) सत्ताधारी भाजपचे (BJP) नगरसेवक वसंत बोराटे यांनी राजीनामा दिल्यानंतर 24 तासांतच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष म्हणून पदभार हाती घेताच अजित गव्हाणे यांनी पाच दिवसांतच भाजपला जोरदार दणका दिला आहे. भाजप चले जाव, या शहरातील उद्याच्या मोर्चानंतर, असे आणखी काही प्रवेश टप्प्याटप्प्याने होणार असल्याचे राष्ट्रवादीच्या एका स्थानिक नेत्याने आज सरकारनामाला सांगितले.

मुंबईतील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात आज सकाळी पक्षनेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बोराटेंचा प्रवेश झाला. या वेळी गव्हाणे, महिला शहराध्यक्षा प्रा. कविता आल्हाट, मुख्य प्रवक्ते योगेश बहल आदी उपस्थित होते. त्यांनी या प्रवेशासाठी बोराटे यांना घेऊन पहाटेच मुंबई गाठली होती. गेल्या पाच वर्षात कुठलेच पद न मिळाल्याने दुखावलेल्या बोराटेंनी पक्ष व स्थानिक नेत्यांनी प्रभागाच्या विकासासाठी ताकद न दिल्याचे कारण देत नगरसेवकपदाचा काल राजीनामा दिला होता. राजकीय दबावाचे राजकारण करण्यात येत असल्याचा आक्षेप घेत भोसरीचे आमदार व भाजपचे शहराध्यक्ष महेश लांडगे यांच्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. बोराटे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे ते नगरसेवक असलेल्या मोशी भागातील राजकीय गणिते बदलणार आहेत. तसेच ते नगरसेवक असलेल्या वॉर्डातील राष्ट्रवादीच्या इच्छुकांमध्ये अस्वस्था वाढली आहे. त्यांच्या प्रवेशात प्रा.आल्हाट यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका निभावल्याचे समजते.

बोराटे हे आमदार लांडगेंच्या मतदारसंघातील असूनही त्यांनी बोराटेंच्या राजीनाम्यानंतर संयमी प्रतिक्रिया दिली होती. मात्र, बोराटेनी राष्ट्रवादीत प्रवेश करताच लांडगेंच्या कट्टर समर्थकांत तीव्र प्रतिक्रिया आज उमटल्या.समाविष्ट गावांवर २० वर्षे अन्याय करणाऱ्या राष्ट्रवादीच्या पंगतीला बोराटेंनी जाणे दुर्दैवी असल्याचे माजी महापौर व नगरसेवक राहुल जाधव म्हणाले. पिंपरी पालिकेत गावे समाविष्ट होवून २० वर्षे तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादीने विकासकामांच्या बाबतीत आणि महत्त्वाच्या पदासाठी समाविष्ट गावांवर अन्याय केला.बोराटेंनी राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी राष्ट्रवादीच्या पंगतीत बसून, समाविष्ट गावांचा स्वाभिमान दुखावला,असे ते म्हणाले.

गेल्या पाच वर्षांत विकासकामे झाली नाही, ही बाब बोराटेंना निवडणुकीच्या तोंडावर आठवली, याचे आश्चर्य वाटते. प्रभागातील विकासकामांसाठी त्यांनी काय पाठपुरावा केला? हा खरा प्रश्न आहे. रस्त्यांच्या कामांना गती देण्यासाठी भूसंपादनाचा विषय मार्गी लावला असता, तर रस्ते का अपूर्ण राहिले असते? ग्रीन झोनबाबत त्यांनी कुणाकडे पाठपुरावा केला? निवडणुकीच्या तोंडावर आपल्या अपयशाचे खापर ते भाजपावर फोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. सत्ताधारी पक्षात असताना विकासकामे करता आली नाही, याचे आत्मचिंतन त्यांनी करावे, अशी टीका आमदार लांडगे समर्थक निखिल बोऱ्हाडे यांनी केली.तर, सभागृहातील अल्प अनुभवामध्ये मोठी राजकीय महत्त्वाकांक्षा ठेवल्यामुळे असा निर्णय घेण्याची वेळ बोराटेंवर आल्याचे लांडगे यांचे दुसरे समर्थक निलेश बोराटे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT