Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागातील सहाय्यक निरीक्षक किरण अर्जून मांजरे (वय ४६) याला त्याच्या कार्यालयातच १७ हजार रुपयांची लाच घेताना ७ जूनला पकडण्यात आले होते. त्या गुन्ह्यात त्याला ४८ तास पोलीस कोठडीत रहावे लागल्यामुळे पालिका आयुक्त तथा प्रशासक शेखरसिंह यांनी त्याला आज महापालिका सेवेतून निलंबित केले.
गेल्या अडीच महिन्यात निलंबित झालेला मांजरे हा तिसरा पालिका कर्मचारी आहे. याअगोदर २१ मार्चला एक लाख रुपयांची लाच घेताना पुणे एसीबीने (ACB) पकडलेला पिंपरी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील लिपिक दिलीप भावसिंग आडे याला २५ मार्च रोजी आयुक्तांनी घरचा रस्ता दाखवला होता. पाणीपुरवठा विभागात देखभाल, दुरुस्तीचे काम करणाऱ्या ३४ वर्षीय ठेकेदाराच्या कामाची फाईल पुढे सरकवण्यासाठी त्याने ही लाच घेतली होती.
तर, फसवणुकीच्या गुन्ह्यात तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) पोलिसांनी (Police) पकडलेला पालिकेचा सफाई कामगार सचिन आनंदा डोळस यालाही आयुक्तांनी त्याच दिवशी घरी बसवले होते. एका दिवसात दोन कर्मचारी निलंबित झाल्याने पिंपरी महापालिकेची मोठी नामुष्की त्यावेळी झाली होती. त्यातून सावरायच्या आत वा बोध घेण्याऐवजी पालिकेतील लाचखोरी पुढे सुरुच राहिली.
पालिकेच्या उद्यानांच्या देखभालीचे काम केलेल्या तरुण ठेकेदाराचे बिल मंजूर करण्यासाठी मांजरेने १७ हजाराची ७ जूनला लाच घेतली त्याची परिणती आज त्याच्या निलंबनात झाली. या दोन्ही लाचखोरीच्या घटनांतील लाचखोर पालिका कर्मचारी आरोपी हे पालिकेच्या तरुण ठेकेदारांमुळे पकडले गेले आहेत, हे विशेष.
दरम्यान, पिंपरी (Pimpri-Chinchwad) पालिकेतील मांजरेच्या ताज्या लाचखोरीच्या प्रकरणात त्याच्याच उद्यान विभागाचा उपलेखापाल संजय देवराम काळभोर (वय ५६) याचाही सहभाग आढळल्याने त्यालाही ८ तारखेला `एसीबी`ने अटक केली. दोघांनाही ४८ तास पोलिस कोठडी झाली. मात्र, निलंबन फक्त एकाचेच (मांजरे) झाल्याने या कारवाईची पालिका वर्तुळात आज दबक्या आवाजात चर्चा सुरु होती.
दुसरीकडे प्रशासकीय राजवट आल्यानंतर एसीबीचे पालिकेतील ट्रॅप वाढले आहेत. त्यातून प्रशासकीय राजवटीतही लाचखोरी वाढल्याचे स्पष्ट होत आहे. गेल्या चार महिन्यात पिंपरी महापालिकेत एसीबीचे तीन ट्रॅप झाले आहेत. त्यातून प्रशासक शेखरसिंह यांचा आपले कर्मचारी व अधिकाऱ्यांवर वचक नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
दुसरीकडे याअगोदर स्थायी समितीतील लाचखोरी प्रकरणात १८ ऑगस्ट २०२१ ला लाच घेताना पकडले गेल्यानंतर निलंबित झालेले चार पालिका कर्मचारी पुन्हा पालिका सेवेत रुजू झाले आहेत. त्यातून लाच घेतली, तरी सहा महिने निम्मा पगार काम न करता घरबसल्या (निलंबन काळात) घेऊन पुन्हा कामावर हजर होता येते, हा संदेश गेल्याने पालिकेतील लाचखोरी थांबलेली नाही. तर, त्यानंतर उलट वाढतच चालली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.