BJP corporators from the Mahesh Landge and Shankar Jagtap factions engaged in a heated argument during the General Body meeting Sarkarnama
पुणे

Pimpri-chinchwad : भाजप आमदार महेश लांडगे विरुद्ध शंकर जगताप गटात 'वादाची' ठिणगी : 'स्थायी'च्या अध्यक्षांवर भाजप नगरसेविकेचा थेट हल्लाबोल

Pimpari-chinchwad Mahapalika : पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपच्या महेश लांडगे आणि शंकर जगताप गटात राडा झाला.

सरकारनामा ब्युरो

Pimpari-chinchwad Mahapalika : मोशी प्राधिकरणात छत्रपती संभाजी महाराज पुतळा उभारण्यात येत आहे. त्या परिसरात स्थापत्य व विद्युतविषयक कामे करून घेण्याच्या ५० कोटी रुपयांचे विषय बुधवारच्या (ता. ११) स्थायी समिती सभेत होते. त्यांना शिवसेनेने आक्षेप घेतल्याने बहूमत असूनही विषय तहकूब ठेवण्याची नामुष्की भारतीय जनता पक्षावर ओढवली. त्याचे पडसाद शुक्रवारी (ता. १३) सर्वसाधारण सभेत उमटले. ‘तुम्ही विरोधकांना साथ दिली’ अशा शब्दांत अध्यक्षांना भाजपच्याच सदस्यांनी खडे बोल सुनावले. त्यामुळे सत्ताधारी भाजपचे आमदार महेश लांडगे आणि शंकर जगताप यांच्या गटांतील नगरसेवक एकमेकांसमोर आल्याचे सभागृहात पहायला मिळाले.

शिवसेना सदस्या सुलभा उबाळे यांच्या आक्षेपामुळे स्थायी समितीने विषय तहकूब केला आहे. त्यावर ‘अभ्यास करून सदस्यांच्या शंकांचे निरसन केले जाईल आणि सोमवारच्या सभेत विषय मंजूर केला जाईल, ’ असे स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी बुधवारी स्पष्ट केले होते. मात्र, भाजपच्या नगरसेविका सारिका बोऱ्हाडे यांनी शुक्रवारीच्या सर्वसाधारण सभेत हा विषय काढला. ‘भाजपची सत्ता असूनही संबंधित विषय तहकूब होणे लाजिरवाणे आहे. स्मारक प्रकल्प माझ्या प्रभागात आहे. त्यात डील काय झाले? रिंग झाली आहे का? याची पाहणी स्थायी समिती सभा होण्याच्या दोन दिवस अगोदर करायला होती. आधी माहिती घेऊन विषय मंजूर करायला होता. यामध्ये तुम्ही विरोधकांना साथ दिली, ’ असा आरोप त्यांनी केला.

त्यावर स्थायी अध्यक्ष बारणे म्हणाले, ‘‘स्थायी समितीच्या काही सदस्यांनी शंका उपस्थित केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणानुसार, भाजपच्या भूमिकेवर कोणी शंका घेऊ नये. पारदर्शक भूमिका असावी. म्हणून सदस्यांच्या माहितीसाठी विषय तहकूब ठेवला आहे. तो सोमवारच्या सभेत शंभर टक्के मंजूर केला जाईल आणि स्मारकाच्या कामाची गती अशीच राहील.’’ स्थायी समितीत झालेला विषय येथे घेऊ नये, असेही त्यांनी सुनावले. त्यावरून भाजप सदस्यच आमने-सामने आल्याचे दिसले.

यांनीही मांडली भूमिका :

सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे म्हणाले, ‘‘छत्रपती संभाजी महाराज स्मारक हा सर्वांच्या अस्मितेचा विषय आहे. त्यात तडजोड होणार नाही.’’

राष्ट्रवादीचे संदीप वाघेरे म्हणाले, ‘‘महापालिकेत ‘रिंग करून ठेके देणे’ असे धोरण अवलंबले जात आहे. कोणाचे उखळ पांढरे करण्यासाठी महापालिका नाही. पुतळ्याला विरोध नाही, ५० कोटी खर्चाला विरोध आहे. संबंधित कामाची पुनर्निविदा काढा. स्पर्धा निर्माण होईल. पुतळ्याच्या नावाखाली कोणी पैसे खात असतील तर चालणार नाही.’’

शिवसेनेच्या सुलभा उबाळे म्हणाल्या, ‘‘विषय तहकूब ठेवून चेअरमन यांनी महापालिकेचे पैसे वाचावले आहेत. प्रत्येक निविदा ३० टक्के कमी दराने आहे. पुतळ्यासाठी खर्च कोणी केला? ते सांगा. कोणी बाहेरून निधी आणला का? धनेश्वर ठेकेदाराची चौकशी झाल्याशिवाय गप्प बसणार नाही. आधीच्या जागेत पैसे वाया गेले. इतका अभिमान आहे तर स्वतःच्या खिशातून पैसे टाका. २० ते २५ कोटी रुपये वाया घालवले. भ्रष्टाचारी लोकांनी संभाजी महाराजांचे नाव घेऊ नये. सर्व प्रकाराची चौकशी व्हावी.’’

भाजपचे संदीप कस्पटे म्हणाले, ‘‘महाराजांच्या नावाने पैसे खात असतील तर विरोध करा.’’

राजू बनसोडे यांनी, पैसे दिल्याशिवाय कामे होत नाहीत. चुकीची कामे खपवून घेणार नाही. आधीचा आयुक्त चोर होता, असा आरोप करीत पैशाचा हार घालून निषेध केला. यापुढे स्थायी समितीमधील विषयांवर सर्वसाधारण सभेत चर्चा करू नये, असा आदेश महापौरांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT