PCMC News : पिंपरी चिंचवड महापालिकेतील शिवसेना पक्षाच्या गटनेतेपदी विश्वजित श्रीरंग बारणे यांची निवड झाली. शिवसेनेच्या नगरसेवकांच्या शनिवारी (ता. 24) झालेल्या बैठकीत ही निवड एकमताने झाली. महापालिकेवर शिवसेनेचे सहा नगरसेवक निवडून आले आहेत. शिवसेना नगरसेवकांनी विभागीय आयुक्त कार्यालयात गटाची नोंदणी केली आहे.
गटनेता निवडीसाठी पक्षाने जिल्हाप्रमुख राजेश खांडभोर यांची नियुक्ती केली होती. खांडभोर यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक झाली. शिवसेना उपनेते, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना उपनेत्या, नगरसेविका सुलभा उबाळे, नगरसेवक नीलेश बारणे, नीलेश तरस, विश्वजित बारणे, नगरसेविका ऐश्वर्या राजेंद्र तरस, रेश्मा कातळे उपस्थित होते. खासदार श्रीरंग बारणे यांनी सर्व नगरसेवकांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
शिवसेनेत दिग्गज व अनुभवी नगरसेवक असताना खासदार श्रीरंग बारणे यांचे चिरंजीव व नवखे असलेल्या विश्वजित बारणे यांची गटनेतेपदी निवड कोणत्या निकषावर केली याबाबत शिवसेनेअंतर्गत दबक्या आवाजात चर्चा असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. सुलभा उबाळे यांची चौथी टर्म असून खासदार बारणे यांचे पुतणे नीलेश बारणे यांची तिसरी टर्म आहे.
शिवसेना शहर प्रमुख नीलेश तरस यांनी अनपेक्षितरित्या राष्ट्रवादीचे दिग्गज समजले जाणारे मोरेश्वर भोंडवे यांच्यासारख्यांचा पराभव करत स्वत:सह पॅनेलमधील तीन नगरसेवक निवडून आणले आहेत. त्यामुळे उबाळे, नीलेश बारणे किंवा नीलेश तरस यांचा विचार होण्याची शक्यता वर्तविली जात होती. अशावेळी अनुभवी व दिग्गज नगरसेवकांची गटनेतेपदी वर्णी का लागली नाही, अशी चर्चा शिवसेनेच्या वर्तुळात आहे.
महापालिका निवडणुकीत भाजपची दुसऱ्यावेळी एकहाती सत्ता काबीज केली आहे. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा पराभव केला. भाजपच्या चारही आमदारांनी जोरदार डावपेच आखत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मात दिली. भाजपचे सर्वाधिक 84 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 37 नगरसेवक विजयी झाले आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे सहा आणि एक अपक्ष नगरसेवक निवडून आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.