PMC Schools Privatization NEWS Sarkarnama
पुणे

Pune News: PMC च्या 5 शाळांसाठी 101 कोटींचा प्रस्ताव; खासगीकरणाला काँग्रेसचा विरोध

PMC Schools Privatization: पुणे महापालिकेच्या पाच इंग्रजी माध्यम शाळांच्या व्यवस्थापनासाठी आकांक्षा फाउंडेशनला पुढील 9 वर्षांत 101.25 कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव. शाळांच्या खासगीकरणाच्या आरोपांमुळे राजकीय वाद.

सरकारनामा ब्यूरो

Pune News: पुणे महापालिकेच्या पाच इंग्रजी माध्यम शाळांच्या व्यवस्थापनासाठी आकांक्षा फाउंडेशनला पुढील नऊ वर्षांसाठी सुमारे १०१ कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. यावरून शहरात नवा वाद निर्माण झाला आहे.

महापालिकेच्या शाळांचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. या प्रस्तावावर आज (ता. ११) स्थायी समितीच्या बैठकीत निर्णय होणार आहे.

महापालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत असलेल्या के. सी. ठाकरे विद्या निकेतन (सोमवार पेठ), सावित्रीबाई फुले इंग्रजी माध्यम शाळा (भवानी पेठ), कै. अनंतराव पवार इंग्रजी माध्यम शाळा (बोपोडी), मातोश्री इंग्रजी माध्यम शाळा (येरवडा) आणि पूज्य कस्तुरबा गांधी इंग्रजी माध्यम शाळा (कोरेगाव पार्क) या पाच शाळांचे व्यवस्थापन २००७ पासून आकांक्षा फाउंडेशनकडे आहे.

या शाळांमधील विद्यार्थ्यांचा गणवेश, शैक्षणिक साहित्य, इमारतींची देखभाल आणि वीजबिलाचा खर्च महापालिका करते. तर मुख्याध्यापक, शिक्षक आणि अन्य मनुष्यबळाचा खर्च फाउंडेशनकडून केला जात होता. मात्र, संस्थेला कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (CSR) निधी मिळणे कमी झाल्याने त्यांनी महापालिकेकडे आर्थिक मदतीची मागणी केली होती.

यानंतर महापालिकेने या शाळांच्या व्यवस्थापनासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला. डिसेंबर २०२५ मध्ये काढलेल्या निविदेत आकांक्षा फाउंडेशन पात्र ठरले. संस्थेने प्रति विद्यार्थी वार्षिक २७ हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र चर्चेनंतर हा दर २५ हजार रुपये प्रति विद्यार्थी, प्रति वर्ष असा निश्चित करण्यात आला.

सध्या या पाच शाळांमध्ये सुमारे ४,५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यानुसार पुढील नऊ वर्षांच्या कालावधीत महापालिकेला सुमारे १०१ कोटी २५ लाख रुपये खर्च करावे लागणार आहेत.

शिक्षण समिती सदस्यांमध्ये नाराजी

या प्रस्तावाची चर्चा शिक्षण समितीत न होता तो थेट स्थायी समितीसमोर आणण्यात आल्याने काही सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या विषयावर पक्षातील पदाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली असता, या प्रकरणात अधिक हस्तक्षेप करू नये, असे सांगण्यात आल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.

काँग्रेसचा विरोध

काँग्रेसचे गटनेते रामचंद्र कदम यांनी या प्रस्तावाला विरोध दर्शविला आहे. "आकांक्षा फाउंडेशनला CSR निधी मिळत नसल्यामुळे महापालिकेने प्रति विद्यार्थी २५ हजार रुपये देण्याची गरज नाही. इतर महापालिका शाळा ज्या पद्धतीने चालवल्या जातात, त्याच पद्धतीने या शाळाही चालवल्या जाव्यात. विद्यार्थ्यांमध्ये कोणताही भेदभाव होऊ नये. त्यामुळे काँग्रेस स्थायी समितीत या प्रस्तावाला विरोध करणार आहे," असे कदम यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT