Pune News : शिवाजीनगर परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय शोधण्यासाठी पुणे महानगरपालिकेने पावले उचलली आहेत. साखर संकुल ते जुना पुणे–मुंबई रस्ता दरम्यान उभारण्यात येणाऱ्या सुमारे 73.52 कोटी रुपयांच्या उड्डाणपूलला मंजुरी देण्यात आली आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ मधील कलम ७२ (ब) अंतर्गत या कामासाठी ७३ कोटी ५१ लाख ६९ हजार २५० रुपयांचे आर्थिक दायित्व स्वीकारण्यास मुख्य सभेची मान्यता मिळावी, यासाठी महापालिका आयुक्तांनी स्थायी समितीमार्फत प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने आता या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे,
वाहतूक कोंडीतून नागरिकांची होणार सुटका
शिवाजीनगर येथील साखर संकुल परिसरातून जुना पुणे–मुंबई रस्त्याकडे जाण्यासाठी सध्या वाहनचालक वाकडेवाडी अंडरपासचा वापर करतात. मात्र, दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येमुळे या अंडरपासची वाहतूक क्षमता आता अपुरी पडत आहे. परिणामी, सकाळ आणि संध्याकाळच्या ऐन गर्दीच्या वेळी या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होते. या त्रासातून कायमची सुटका व्हावी, अशी मागणी नागरिक, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि स्थानिक आमदारांकडून सातत्याने केली जात होती. याची गंभीर दखल घेत पुणे महापालिकेच्या प्रकल्प विभागाने येथे उड्डाणपूल आणि ग्रेड सेपरेटर उभारण्याचे नियोजन केले आहे
प्रकल्पाचा आत्तापर्यंतचा प्रवास
१४ ऑगस्ट २०२५ रोजी या प्रकल्पासाठी 'मे. प्रितम एन्टरप्रायजेस' यांची तज्ज्ञ सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांनी या परिसराचे टोपोग्राफिकल सर्वेक्षण, भूगर्भीय तपासणी आणि वाहतुकीचा सखोल अभ्यास करून रेल्वे उड्डाणपुलाचा विस्तृत आराखडा तयार केला. प्रकल्पासाठीच्या ७३.५१ कोटींच्या पूर्वगणनपत्रकाला २० नोव्हेंबर २०२५ रोजी तांत्रिक छाननी समितीने मंजुरी दिली. त्यानंतर, निविदा प्रक्रिया सुरू करण्यासाठी आवश्यक असणारी प्रशासकीय मान्यता महापालिका आयुक्तांनी १९ जानेवारी २०२६ रोजी दिली आहे.
महापालिकेच्या २०२५-२६ च्या मूळ अर्थसंकल्पात या कामासाठी तरतूद नव्हती. मात्र, वर्गीकरणाद्वारे २ कोटी ६० लाख रुपयांची प्रारंभिक तरतूद उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने ५ जानेवारी २०२६ रोजी मंजूर केला, ज्याला मुख्य सभेने १९ जानेवारी २०२६ रोजी मान्यता दिली. या निधीतून प्राथमिक कामे तातडीने सुरू केली जाणार आहेत.
दीड वर्षांत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
महापालिकेच्या नियोजनानुसार, प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतर पावसाळ्याचा कालावधी वगळता सुमारे दीड वर्षांत हा उड्डाणपूल पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रकल्पाचा एकूण खर्च मोठा असल्याने उर्वरित निधी पुढील दोन आर्थिक वर्षांच्या अंदाजपत्रकातून टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.