PMC  Sarkarnama
पुणे

PMC News : भाजप नगरसेविकेच्या अनधिकृत कार्यालयावर पुणे महापालिका 'मेहरबान', सोसायटीलाच बांधकाम हटविण्याचे आदेश

Pune BJP Corporator : शहरात अनधिकृत बांधकांविरोधात पुणे महापालिकेकडून कारवाई सुरू आहे. मात्र, नगरसेविकेच्या कार्यालयाच्या अनधिकृत बांधकामाला अभय दिले आहे.

सरकारनामा ब्यूरो

Pune BJP : शहरात अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांविरोधात महापालिकेने कारवाईचा धडाका लावला असताना दुसरीकडे नगरसेविकेच्या कार्यालयाच्या अनधिकृत बांधकामाला मात्र अभय मिळाल्याचे चित्र आहे. सोसायटीच्या सामायिक ॲमेनिटी स्पेसमध्ये उभारलेल्या या कार्यालयाविरोधात वारंवार तक्रारी करूनही बांधकाम विभागाने कारवाई केलेली नाही.

उलट हे बांधकाम सोसायटीनेच काढावे आणि त्याचा अहवाल सात दिवसांत सादर करावा, असे पत्र सोसायटीच्या अध्यक्ष आणि सचिवांना पाठवून महापालिकेने आपली जबाबदारी झटकली आहे.

विणकर सभागृहासमोरील विणकर सोसायटीसह परिसरातील विविध सोसायट्यांच्या सामायिक खुल्या जागा आणि ॲमेनिटी स्पेसमध्ये अनधिकृत बांधकामे झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. एका राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधीने या जागेत कार्यालय उभारल्याचा आरोप आहे. यासंदर्भात सोसायटीच्या सभासदांनी बांधकाम विभागाकडे पाचवेळा पत्रव्यवहार केला. मात्र, अद्याप कारवाई झालेली नाही.

सर्व सोसायट्यांसाठी सामायिक असलेली जागा एका सोसायटीतील काही पदाधिकाऱ्यांनी बेकायदा भाडेपट्ट्याने दिल्याचा आरोप एका संघटनेने केला आहे. त्यानंतर घाईघाईने बांधकाम उभारण्यात आल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

सहा महिन्यांपूर्वी हे कार्यालय उभारले असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. उपअभियंता कन्हैयालाल लखानी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी यासंदर्भात माहिती घेऊन सांगितले जाईल, असे स्पष्ट केले.

माजी अधिकाऱ्यावर आयुक्त भडकले

पुणे महापालिकेतील आयुक्त म्हणून काम केलेल्या माजी IAS अधिकाऱ्याने शहरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांच्या विरोधात सुरू असलेल्या कारवाईवर टीका केली होती. त्यावर त्या अधिकाऱ्याचे नाव न घेता पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी एक्सवर पोस्ट करत त्यांच्यावर टीका केली. त्यामध्ये म्हटले आहे की,पुणे मनपा मध्ये सर्वात वरिष्ठ पदावर असताना त्यांनी पुणे शहरामध्ये सुधारणा घडवण्यासाठी नेमकी कोणती पावले उचलली आणि त्याची फालनिष्पत्ती काय झाली हे शोधले तर काहीही ठोस सापडणार नाही, अशी टीका महापालिका आयुक्तांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT