Medical College Scam: पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेजमध्ये मोठा भरती घोटाळा? प्राध्यापकपदासाठी प्रत्येकी 8 ते 13 लाखांची 'डिमांड'

Pune Recruitment Scam : पुणे महापालिकेने 2022 मध्ये स्वतःचे अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले. या महाविद्यालयासाठी तज्ज्ञ डॉक्टर प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, यासह शिक्षकेतर कर्मचारी आवश्यक असल्याने महापालिकेने नियमावली, बिंदुनामावली तयार करून भरती प्रक्रिया सुरू केली.
PMC Medical College Scam
PMC Medical College ScamSarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune News: पुणे महापालिकेच्या अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात कायमस्वरूपी प्राध्यापकपदी भरती करताना याच रुग्णालयात कंत्राटी काम करणाऱ्या प्रत्येक प्राध्यापकाकडून प्रत्येकी साडेतीन महिन्यांचा पगार म्हणजे आठ लाख ते तेरा लाख रुपये घेतले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यापैकी 11 डॉक्टरांना कायमस्वरूपी नोकरी मिळाली आहे. नोकरी न मिळालेल्या तिघांनी यात पैसे घेतल्याचा आरोप करत महापालिका आयुक्त, महापौर आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे.

पुणे महापालिकेने 2022 मध्ये स्वतःचे अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले. या महाविद्यालयासाठी तज्ज्ञ डॉक्टर प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, यासह शिक्षकेतर कर्मचारी आवश्यक असल्याने महापालिकेने नियमावली, बिंदुनामावली तयार करून भरती प्रक्रिया सुरू केली. गेल्या वर्षभरापासून येथे विविध पदांची भरती सुरू आहे.

दरम्यान, या महाविद्यालयासाठी सुरुवातीला कंत्राटी पद्धतीने डॉक्टरांची प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. येथे कायमस्वरूपी प्राध्यापकांची आवश्‍यकता असल्याने त्यासाठी प्रक्रिया सुरू केली. कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या 28 जणांना या भरतीमध्ये प्राधान्य दिले जाईल असे सांगण्यात आले होते.

भरती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर या प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक यांच्याकडे प्रत्येकाने साडेतीन महिन्यांचा पगार नोकरी लागण्यासाठी द्यायचा असे सांगण्यात आले. त्यानुसार प्राध्यापकासाठी १३ लाख, सहयोगी प्राध्यापकासाठी १० लाख आणि सहाय्यक प्राध्यापकासाठी ८ लाख रुपये घेण्यात आले. हे पैसे वर दिले जाणार असल्याचे या डॉक्टरांना सांगण्यात आले.

PMC Medical College Scam
Pune News: पुण्यातील कॉलेजमध्ये धक्कादायक घटना; 19 वर्षीय तरुणी तब्बल 14 तास लिफ्टमध्ये अडकली, नेमकं काय घडलं..?

पण आता एक वर्ष होत आले तरी यातील 11 जणांना अजूनही कायमस्वरूपी नोकरी मिळालेली नाही. त्यांची फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर यासंदर्भात वैद्यकीय महाविद्यालयाच्या ट्रस्टच्या पदसिद्ध अध्यक्षा म्हणून महापौर, आयुक्त यांच्याकडे तक्रार केली आहे. तेथे अजूनही दाद न मिळाल्याने तक्रार करणाऱ्यांमध्ये डॉ. प्रवीण तायडे, डॉ. अमिता साळे, डॉ. गीता बाटलीवाल यांचा समावेश आहे.

सहकारीच निघाले एजंट

तक्रारदार डॉ. प्रवीण तायडे म्हणाले, ‘‘28 कंत्राटी डॉक्टरांपैकी तिघांनी पैसे गोळा करण्यामध्ये पुढाकार घेतला होता. त्यांनी सुमारे 3 कोटी रुपये जमा केले आहेत. पण त्यातील पैसे घेणारे तिघे व उर्वरीत आठ जणांना नोकरी मिळाली. 11 जणांना अद्याप नोकरी मिळालेली नाही. पैसे दिलेले सहा जण इतरत्र नोकरीसाठी गेले आहेत, त्यांना पैसे परत मिळाले की नाही याची कल्पना नाही. आमच्या तीन सहकारी डॉक्टरांनीच एजंट म्हणून काम केले आहे. त्यांनी ते पैसे पुढे संबंधितांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी घेतली होती.

PMC Medical College Scam
BJP leader News : भाजपच्या गोटात खळबळ; बड्या नेत्याने कमळाची साथ सोडून धरला विरोधी पक्षाचा हात; राजकीय समीकरणे बदलणार?

‘‘वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापकपदाची नोकरी लावून देण्याच्या अमिषाने डॉक्टरांकडून पैसे घेतल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. तक्रारदारांकडे आणखी काही कागदपत्रांची मागणी केली आहे. त्यानंतर पुढील दोन-तीन दिवसांत त्यांचा जबाब नोंदवून घेतला जाईल. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासंदर्भात मुख्यालयाकडे अर्ज केला जाईल. त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर महापालिका आयुक्तांकडे चौकशीची परवानगी घेतली जाईल. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.’’

- शिरीष सरदेशपांडे, अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग

‘‘यासंदर्भात महापालिकेकडे तक्रार प्राप्त झाली असून, आयुक्तांशी यासंदर्भात चर्चा झाली असून, यात चौकशी केली जाईल. चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्यांना पाठीशी घातले जाणार नाही.’’

- मंजुषा नागपुरे, महापौर, तथा अध्यक्ष, वैद्यकीय महाविद्यालयाच्या ट्रस्ट

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.