Pune News : मुंबई महापालिकेतील कोविड घोटाळ्याच्या चौकशीचा ‘संसर्ग’ आता पुणे महापालिकेतही पोचला आहे. कोविडच्या उपचार साहित्यात गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवून, पुणे महापालिकेचे तत्कालीन आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारतींसह तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
गंभीर म्हणजे, या प्रकरणात पोलिसांच्या तपासानुसार न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेने पुणे महापालिकेतील आरोग्य खात्यासह सर्वच वरिष्ठांचे धाबे दणाणले आहेत. (Latest Marathi News)
परिणामी, भारतींविरोधातच गुन्हा दाखल झाल्याने कोविड काळातील सर्वच उपचार व्यवस्था, त्यासाठीचे साहित्य खरेदी आणि अन्य बाबींवरील खर्चाची चौकशी होण्याची शक्यता आहे. यानिमित्ताने पुणे महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेंचेच ‘पोस्टमार्टेम’ होणार, हे निश्चित आहे. कोविडची साथ संपूनही दोन वर्षे होत आली; तरीही या काळातील व्यवहारांच्या चौकशी सुरूच आहेत. त्यात सत्ताधारी आणि विरोधकांमधील राजकारणातून मुंबई महापालिकेच्या कारभाराची चौकशी सुरू आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्यात मुंबईतील जम्बो कोविड सेंटरमधील घोटाळ्यात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांना ताब्यात घेतले. त्याचवेळी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांनाही ‘ईडी’च्या चौकशीला तोंड द्यावे लागत आहे.
त्याशिवाय काही वरिष्ठ अधिकारीही आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत. मुंबईतील कोविड घोटाळ्याच्या चौकशांचा फेरा वाढत असतानाच पुणे महापालिकेतील एका घोटाळ्याने महापालिका प्रशासन हादरले आहे. त्यामुळे आता तपासात आणखी कोणाकोणाची नावे पुढे येणार हे पाहावे लागणार आहे.
महापालिकेचे तत्कालीन आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती, आरोग्य अधिकारी डॉ. अरुणा सूर्यकांत तरडे, डॉ. ऋषिकेश हनुमंत गार्डी यांच्या विरोधात वारजे माळवाडी पोलिस ठाण्यामध्ये कोविड काळात ८० ते ९० लाख रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा प्रकार २०२१ मध्ये कोविड काळात कै. अरविंद बारटक्के रुग्णालय वारजे या ठिकाणी घडला आहे. या प्रकरणी वारजे पोलिस ठाण्यात महापालिकेचे माजी आरोग्य अधिकारी सतीश बाबूराव कोळुसरे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेलेल्या माहितीनुसार, डॉक्टर तरडे डॉ. गार्डी आणि डॉ. भारती यांनी आपसात संगनमत करून कोविड काळामध्ये शासनाकडून नागरिकांसाठी आलेल्या टेस्टिंग किट वापरल्या असल्याचे भासवून ते टेस्टिंग किट प्रायव्हेट लॅब आणि खासगी व्यक्तींना विकण्यात आले.
त्यामधून जवळपास ८० ते ९० लाख रुपयांची अफरातफर झाली असल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. यासाठी सरकारी कागदपत्रांमध्ये फेरफार करून खोटी कागदपत्रे खरी असल्याचे भासवण्यात आली आहेत. या माध्यमातून फसवणूक करण्यात आली असल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक जैतापूरकर करीत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.