Pimpri-Chinchwad Political Sarkarnama
पुणे

Pimpri-Chinchwad Politics: पिंपरीत राजकारण तापलं; भाजप- राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप

BJP-NCP Politics: गेल्या पाच वर्षात पिंपरी महापालिकेत काय दिवे लावले? राष्ट्रवादीची भाजपला विचारणा

सरकारनामा ब्यूरो

Pimpri News: राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनात भाजपचे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात पिंपरी-चिंचवड शहराला काय मिळाले?, अशी टीका अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना काल केली होती. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी उत्तर देत या चोराच्या या उलट्या बोंबा असल्याचा हल्लाबोल आज केला.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पिंपरी-चिंचवडसाठी २०१८ ला स्वतंत्र पोलीस आयुक्तालय उभारण्याचा निर्णय झाला. मात्र, नंतर आघाडीच्या सत्ताकाळात त्याला पायाभूत सोयीसुविधा मिळाल्या नाहीत. गेल्या २० वर्षांत पिंपरी-चिंचवडचे प्रश्न त्यांच्या नेत्यांनी प्रलंबित ठेवले गेले, अशी टीका आमदार लांडगे यांनी काल विधानसभेत केली होती.

त्याचा समाचार घेताना आपल्या सत्ताकाळात शहरातील एकही प्रश्न सोडवू न शकलेल्या भाजपकडून पोलीस आयुक्तालयासारख्या मुद्यांवर भरकटविण्याचे कारस्थान सुरु असल्याचा आरोप गव्हाणेंनी केला. विधानसभेत जनतेचे प्रश्न मांडण्याऐवजी आमदारांनी केवळ राजकारण करण्यावरच समाधान मानल्यामुळे या ‘चोरांच्या उलट्या बोंबा’असल्याचा हल्लाबोल त्यांनी लांडगेंचे नाव न घेता केला.

ज्या पोलीस आयुक्तालयाचे श्रेय भाजपकडून घेतले जाते. त्या पोलीस आयुक्तालयाच्या प्रशासकीय कामकाजास तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारनेच सुरुवात केली होती. 2014 साली भाजपची सत्ता आल्यानंतर हा निर्णय लगेच होणे अपेक्षित असतानाही तब्बल तीन वर्षे तो रखडविण्यात आला होता.

जे श्रेय लाटतात त्यांनी 2014 ऐवजी पोलीस आयुक्तालय होण्यास तीन वर्षे विलंब का लागला? त्याचे उत्तर द्यावे, असे आव्हान गव्हाणेंनी आमदार लांडगेंना दिले आहे. भाजपचे गल्ली ते दिल्लीपर्यंत सरकार असूनही त्यांना रेडझोनचा प्रश्न सोडविता आला नाही. उलट, रावेतकरांच्या माथी नव्याने रेडझोनची टांगती तलवार लटकवली, हे जनतेला घाबरविण्यासाठी भाजपचे कृत्य असल्याचा दावाही गव्हाणेंनी केला.

शहरातील साडेबारा टक्क्याचा प्रश्न सोडविला असे सांगून भाजपने आनंदोत्सव केल्याला तीन महिने उलटूनही त्याबाबत जीआर अद्यापही निघालेला नाही, याकडे गव्हाणेंनी लक्ष वेधले. शहरातील शास्तीकर रद्द करण्यात आला नसून आतापर्यंतचा तो फक्त माफ केला गेला असल्याने हा प्रश्न कायम आहे.

अनधिकृत बांधकामाचाही प्रश्न कायम आहे. गेल्या पाच वर्षाच्या सत्ताकाळात पिंपरी पालिकेत भाजपने काय दिवे लावले?, अशी विचारणा करीत लाचखोरी व खंडणीत त्यांचे नेते तुरुंगात गेले. जनतेच्या हिताचा एकही प्रकल्प न राबविणार्‍यांना आता मतांसाठी धर्माचा आधार घ्यावा लागत आहे, अशी नेमकी टीका गव्हाणेंनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT