Pune News : काँग्रेसचे पुणे शहर व जिल्हा प्रभारी सतेज पाटील यांच्या विरोधात अज्ञातांनी पुण्यात केलेल्या बॅनरबाजीमुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. या प्रकरणी पुणे शहर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत पोलिसांत धाव घेतली असली, तरी या बॅनरबाजीमुळे काँग्रेसमधील 'अंतर्गत गटबाजी' आणि 'नाराजी' मात्र चव्हाट्यावर आली आहे.
नुकतेच पुणे शहर काँग्रेसमध्ये मोठे संघटनात्मक बदल झाले आहेत. पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष पदावरून अरविंद शिंदे यांची उचलबांगडी झाल्यानंतर ही भाकरी फिरवून पक्षाची जबाबदारी पुणे (पूर्व) शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि पुणे (पश्चिम) शहराध्यक्षा दीप्तीताई चौधरी यांच्यावर सोपवण्यात आली आहे. सतेज पाटील हे जिल्ह्याचे प्रभारी असल्याने या खांदेपालटाचे खापर अप्रत्यक्षपणे त्यांच्यावरच फोडले जात आहे.
त्यामुळे ही बॅनरबाजी खरोखरच विरोधकांनी केली आहे? की, शहराध्यक्ष बदलामुळे दुखावलेल्या काँग्रेसमधीलच एखाद्या असंतुष्ट गटाने प्रभारींवर राग काढण्यासाठी हा 'घरचा आहेर' दिला आहे? 'घर का भेदी' नक्की कोण? असे अनेक प्रश्न आता या निमित्ताने राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहेत.
शहरातील विविध चौकांमध्ये सतेज पाटील यांच्या विरोधात अज्ञातांनी लावलेल्या अवमानकारक बॅनर्सची गंभीर दखल घेतली आहे. आज पुणे (पूर्व) शहराध्यक्ष प्रशांत जगताप आणि पुणे (पश्चिम) शहराध्यक्षा दीप्ती चौधरी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या अज्ञाता विरोधात थेट गुन्हे दाखल करण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, मागील २-३ दिवसांत माजी गृहराज्यमंत्री सतेज (बंटी) पाटील यांच्याबाबत बदनामीकारक मजकूर छापून शहरातील विविध चौकांमध्ये अनधिकृत बॅनर्स लावले गेले आहेत. हा खोडसाळपणा सतेज पाटील यांच्यासह काँग्रेस पक्षाला बदनाम करणारा आणि पुणे शहरातील शांतता व सुव्यवस्था भंग करणारा आहे.हे सर्व बॅनर्स पुणे शहर पोलिसांच्या CCTV कक्षेत येणाऱ्या भागांत लावण्यात आले आहेत. त्यामुळे पोलिसांनी तातडीने सीसीटीव्ही फुटेज तपासून गुन्हेगारांचा छडा लावावा.
दोषींवर माजी राज्यमंत्र्यांची बदनामी करणे, राष्ट्रीय पक्षाच्या नावाचा गैरवापर करणे, शहर विद्रूपीकरण आणि शहरात दंगल सदृश्य वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करणे याअंतर्गत कडक गुन्हे दाखल करावेत. अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
एकीकडे काँग्रेसने या प्रकरणाचे खापर विरोधकांवर फोडत पक्षांतर्गत एकजुटीचा देखावा उभा करण्याचा प्रयत्न केला आहे, तर दुसरीकडे पक्षातील अंतर्गत खदखद लपून राहिलेली नाही. आता अप्पर पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर, पोलीस या अज्ञात बॅनरबाजांचा शोध कसा घेतात आणि यामागे नेमका कुणाचा 'हात' निघतो विरोधकांचा की अंतर्गत असंतुष्टांचा हे पाहणे आता कमालीचे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.