Harshvardhan Patil | Sharad Pawar sarkarnama
पुणे

Sharad Pawar : मोठी बातमी! इंदापुरात शरद पवारांच्या निष्ठावंतानं फडकवलं बंडाचं निशाण; हर्षवर्धन पाटलांच्या अडचणीत भर

Indapur Assembly Constituency : इंदापुरातून दत्तात्रय भरणे यांना पुन्हा उमेदवारीचे संकेत अजितदादा पवार यांनी दिले होते. यानंतर हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र, हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशानंतर राष्ट्रवादीतील निष्ठावंत नाराज झाले होते.

Akshay Sabale

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी ऐन विधानसभेपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ( शरदचंद्र पवार ) प्रवेश केल्यानं पक्षातील निष्ठावंत नाराज झाले होते. हर्षवर्धन पाटील यांना दिलेली उमेदवारी मागे घ्यावी, अन्यथा बंडखोरी अटळ असल्याचा इशारा निष्ठावतांनी ‘परिवर्तन’ मेळाव्याच्या माध्यमातून दिला होता. मात्र, ही बंडखोरी राष्ट्रवादी काँग्रेसला ( शरदचंद्र पवार ) रोखता आली नाही. अखेर प्रवीण माने यांनी बंडखोरी केली आहे.

जिल्हा परिषदचे माजी बांधकाम आणि आरोग्य सभापती, सोनाई उद्योगसमूहाचे संचालक प्रवीण माने हे 23 ऑक्टोबरला अर्ज दाखल करणार असल्याचं वृत्त ‘टीव्ही 9 मराठी’नं दिलं आहे. माने यांनी अपक्ष अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेससाठी ( शरदचंद्र पवार ) मोठा धक्का मानला जातोय.

प्रवीण माने विधानसभेच्या आखाड्यात आल्यास तिरंगी लढत होऊ शकते. तसेच, हर्षवर्धन पाटील ( Harshvardhan Patil ) यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रवीण माने यांची समजूत काढण्याचा प्रयत्न होतो का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

हर्षवर्धन पाटील यांचा 7 ऑक्टोबरला इंदापुरातील मेळाव्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ( शरदचंद्र पवार ) प्रवेश झाला होता. यानंतर विधानसभेसाठी इच्छुक असलेले जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, प्रवीण माने, कर्मयोगी कारखान्याचे भरत शहा यांनी खदखद व्यक्त केली होती.

त्यानंतर 11 ऑक्टोबरला नाराज असलेल्या निष्ठावतांनी ‘परिवर्तन’ मेळाव्याचं आयोजन केलं होतं. तेव्हा, हर्षवर्धन पाटील यांना दिलेली उमेदवारी शरद पवार यांनी न बदलल्यास इंदापुरात बंडखोरी आणि परिवर्तन अटळ आहे, असा इशारा निष्ठावतांनी दिला होता. तसेच, राष्ट्रवादीतून उमेदवारीसाठी अर्ज केलेल्या कोणालाही उमेदवारी देण्याची यावी, असं आवाहन केलं होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT