पुणे

MIM News : लोकसभा निवडणुकीतून 'एमआयएम'ची विधानसभेची तयारी

Uttam Kute

Maharashtra Politics : पुणे लोकसभा मतदारसंघात 'एमआयएम'ने माजी नगरसेवक अनिस सुंडके यांना उमेदवारी दिल्याने तेथील लढत आता चौरंगी झाली आहे. त्यानंतर आता मावळ, शिरूरमध्ये एमआयएम उमेदवार देणार का, याकडे लक्ष लागले आहे. कारण या तिन्ही जागा लढविण्याची मागणी पक्षाचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष धम्मराज साळवे यांनी केली आहे.

दहा दिवसांपूर्वी राष्ट्रवादीतून 'एमआयएम'मध्ये (MIM) आलेल्या सुंडकेंना लगेच लोकसभेची लॉटरी लागली. दरम्यान, पुण्यात लोकसभेला उमेदवार देण्यामागे आगामी विधानसभेची मोर्चेबांधणी असल्याचे 'एमआयएम'च्या एका पदाधिकाऱ्याने 'सरकारनामा'ला सांगितले. कसबापेठ, हडपसर, पुणे कॅन्टोन्मेंट हे विधानसभा मतदारसंघ या लोकसभा उमेदवारीतून 'एमआयएम'ने विधानसभेसाठी आपल्या रडारवर घेतले आहेत. राज्यातही उमेदवार दिलेल्या ठिकाणी त्यांची हीच खेळी आहे. 'एमआयएम' आणि वंचित बहुजन आघाडी ही गेल्यावेळी लोकसभा एकत्र लढले होते. त्यामुळे वंचितलाही आपली ताकद लोकसभा निवडणुकीतून दाखवून देण्याचा हेतू 'एमआयएम'चा आहे.

मावळ, बारामती आणि शिरूरमध्येही उमेदवार द्यावा, अशी लेखी मागणी साळवे यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील imtiyaz jaleel यांच्याकडे नुकतीच केली आहे. त्यासाठी त्यांनी पक्षाच्या उमेदवारांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या गेल्यावेळच्या निवडणुकीत घेतलेल्या साडेअठरा हजार मतांकडे लक्ष वेधले. तसेच उमेदवारीसाठी अनेक इच्छुक असल्याचा उल्लेखही त्यांनी या पत्रात केला आहे. मात्र, ही मागणी मान्य होण्याची शक्यता कमी आहे.

जिंकून येईल एवढी पक्षाची ताकद बारामती, शिरूर, मावळमध्ये नसल्याने तेथे एमआयएमने लोकसभेचा उमेदवार देण्याची शक्यता नसल्याचे पक्षाच्या एका प्रदेश पदाधिकाऱ्याने या संदर्भात बोलताना सांगितले. या ठिकाणी उमेदवार दिले तर त्याचा फायदा भाजपला BJP होणार असल्याने या जागा पक्ष लढणार नाही, असेदेखील पदाधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, पु्ण्यात उमेदवार दिल्याने शिरूर, मावळ, बारामतीतील आघाडीचे उमेदवार काहीसे धास्तावले होते. कारण 'एमआयएम'च्या उमेदवारीचा फटका त्यांनाच बसणार होता. तर, हे उमेदवार रिंगणात उतरण्याच्या शक्यतेने महायुतीचे तिन्ही उमेदवार सुखावले होते. पण, त्यांचा हा आनंद क्षणभंगूर ठरण्याचीच शक्यता जास्त आहे.

(Edited By Roshan More)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT