Chandrakant Patil Sarkarnama
पुणे

चंद्रकांत पाटलांच्या कार्यक्रमात तडीपार गुंडांची उपस्थिती; राष्ट्रवादीचा आरोप

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलादी हातांनी पुण्याची गुंडगिरी मोडून काढा, अशी गर्जना केली होती. त्याचे काय झाले?

Umesh Vishnu Ghongade

सरकारनामा ब्यूरो

पुणे : सुसंस्कृत पुण्याची संस्कृती बिघडवायचे काम भारतीय जनता पार्टी आणि त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील करत आहे. तडीपार करण्यात आलेले गुंड पाटील यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहू लागले आहेत, असा धक्कादायक आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज पत्रकार परिषदेत केला. पाटील यांच्या कार्यक्रमात सहभागी असलेल्या तडीपार गुंडाचे छायाचित्र जगताप यांनी सादर केले.

पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ व संतोष लांडे यांच्या कुटुंबियांनी मंगळवारी पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावत पाटील यांचा सत्कार केला. या पाश्‍र्वभूमीवर शहराध्यक्ष जगताप यांनी पत्रकार पीरषद घेत आज पाटील यांच्यावर टीका केली.तडीपार गुंड दीपक गागडे व नाना मोघे हे पाटील यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचे जगताप यांनी सांगितले. यापैकी गागडे याचा चंद्रकात पाटील यांच्यासोबतचे छायाचित्र जगताप यांनी पत्रकार परिषदेत सादर केले.

ते म्हणाले, ‘‘ सुसंस्कृत पक्ष अशी बिरुदावली मिरविणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा व या पक्षाच्या नेत्यांचा खरा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी जणू पुण्याची संस्कृती बिघडविण्याचा चंगच बांधला आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच, भाजप पुण्याची संस्कृती कोणत्या दिशेने घेऊन जात आहे, हेही या निमित्ताने स्पष्ट होत आहे.’’

जगताप म्हणाले, ‘‘ गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांच्या कुटुंबातील काही मंडळींनी मंगळवारी चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेशाचा प्रयत्न केला. परंतु, महापौर मुरलीधर मोहोळ व इतर नेत्यांनी या वेळी या प्रवेशाबाबत हात वर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुख्यात गुंड दीपक गागडे व नाना मोघे हे चंद्रकांत पाटील यांच्यासोबत यापूर्वी कार्यक्रमांत दिसून आले आहेत. विशेष म्हणजे तडीपार असताना चंद्रकांत पाटील यांच्यासोबत या गुंडांची उपस्थिती होती. मंगळवारीही पुन्हा याच प्रकारची पुनरावृत्ती झाली. या घटना पाहता चंद्रकांत पाटील पुण्याची संस्कृती कोणत्या दिशेने नेऊ पाहात आहेत, शांत पुण्याला अशांत करण्याचा प्रयत्न का करीत आहेत, भाजपकडून आगामी पुणे महानगरपालिकेची निवडणूक अशा गुंड प्रवृत्तीवरच लढवली जाणार आहे का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. चंद्रकांत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष व पुणे शहरातील लोकप्रतिनिधी म्हणून या प्रश्नांची उत्तरे देण्याची गरज आहे.’’

तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलादी हातांनी पुण्याची गुंडगिरी मोडून काढा, अशी गर्जना केली होती. त्याचे काय झाले? या गर्जनेचा भाजपला विसर पडला आहे का? जे प्रदेशाध्यक्ष या गुंडगिरीला बळ देत आहेत, त्यांना पुण्याची शांतता भंग होऊ देऊ नका, हे सांगण्याचे फडणवीस यांचे धारिष्ट्य नाही का, असा आमचा सवाल आहे, असे जगताप यांनी सांगितले.

पुण्याची ओळख ही सुसंस्कृत शहर म्हणून आहे. ती तशीच राहू देण्याची लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. शहराच्या विकासाच्या प्रश्नांपासून पळ काढणारे चंद्रकांत पाटील यांनी निदान पुण्याची संस्कृती बिघडू न देण्याच्या जबाबदारीपासून तरी पळ काढू नये, हे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आम्ही चंद्रकांत पाटील यांना सांगू इच्छितो, असे जगताप यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT