EVM Machines Procession  Sarkarnama
पुणे

Indapur News : इंदापुरात डीजेच्या दणदणाटात ‘ईव्हीएम’ची घोड्यावरून काढली मिरवणूक

Maharashtra Political Protest : एकीकडे ईव्हीएम हटवून बॅलेटची मागणी होत असताना इंदापूर तालुक्यातील तरंगवाडीत ‘ईव्हीएम’चे समर्थन करून त्याची घोड्यावरून डीजेच्या दणदणाटात मिरवणूक काढण्यात आली.

संतोष आटोळे

Indapur, 09 December : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात ‘ईव्हीएम’च्या विरोधात रान उठले आहे. विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी (ता. माळशिरस) ग्रामस्थांनी तर ‘ईव्हीएम’ हटवून बॅलेट पेपर मतदान घेण्याची तयारी दाखवली होती. ‘ईव्हीएम’च्या विरोधात पाऊल उचलणारे मारकडवाडी जगाच्या नकाशावर आले आहे. एकीकडे ईव्हीएम हटवून बॅलेटची मागणी होत असताना इंदापूर तालुक्यातील तरंगवाडीत ‘ईव्हीएम’चे समर्थन करून त्याची घोड्यावरून डीजेच्या दणदणाटात मिरवणूक काढण्यात आली.

मारकडवाडी ग्रामस्थांनी ‘ईव्हीएम’वर संशय व्यक्त करत बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची तयारी चालवली होती. पण, जिल्हा प्रशासनाने मारकडवाडी ग्रामस्थांना ‘मॉकपोल’ची परवानगी नाकारली होती. मात्र, ईव्हीएमला विरोध करणारे मारकवाडीच्या ग्रामस्थांना भेटण्यासाठी देशभरातील नेते येत आहेत. त्यामुळे मारकडवाडी एकदम देशाच्या नकाशावर झळकत आहे.

एकीकडे विरोधी पक्षाकडून ईव्हीएमला जोरदार विरोध होत आहे. अनेक ठिकाणी आंदोलने आणि निषेध मोर्चे काढण्यात येत आहेत. मारकडवाडीत माजी न्यायमूर्ती, ज्येष्ठ नेते शरद पवार, जयंत पाटील यांनी हजेरी लावून ग्रामस्थांशी संवाद साधला. काँग्रस नेते राहुल गांधी हेही मारकडवाडीत येणार आहेत, त्यामुळे ईव्हीएमच्या विरोधात विरोधकांकडून जोरदार मार्चेबांधणी करण्यात येत आहे.

ईव्हीएमला विरोध होत असताना दुसरीकडे इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी ग्रामस्थ मात्र ‘ईव्हीएम’च्या समर्थनात उतरले आहेत. तरंगवाडी ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी करत डीजेच्या दणदणाटात प्रतिकात्मक पद्धतीने ईव्हीएमची घोड्यावरून मिरवणूक काढली आहे. निवडणुकीसाठी आगामी काळात ईव्हीएम वापराला आमच्या गावाचे समर्थन आहे, अशी भूमिका तरंगवाडी ग्रामस्थांनी घेतली आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष डाॅ. शशिकांत  तरंगे यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आली. या रॅलीत भाजपचे माऊली वाघमोडे, सरडेवाडीचे सरपंच सीताराम जानकर, सरपंच मुक्ताबाई तरंगे, उपसरपंच कांतीलाल तरंगे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT