Swargate Police Station in Pune, where an FIR was filed in the Pune assault case involving Congress spokesperson Hanumant Pawar. Sarkarnama
पुणे

Pune Crime : 'नक्षलवाद्यांना तुला मारायला लावीन...', काँग्रेसच्या हनुमंत पवारांना मारहाण का केली? तुषार दामगुडेंनी स्पष्टच सांगितलं

Hanumant Pawar vs Tushar Damgude : काल पुण्यात काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांना हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे आणि त्यांच्या साथीदारांनी मारहाण केल्याची घटना घडली. त्यानंतर आता हा वाद नेमका कुठून सुरू झाला याबाबतची माहिती समोर आली आहे.

Jagdish Patil

Pune News, 24 Feb : पुण्यात काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांना हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडे आणि त्यांच्या साथीदारांनी बंदुकीचा धाक दाखवत मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या मारहाण प्रकरणी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते हनुमंत पवार यांनी स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. त्यानुसार तुषार दामगुडे, बाळासाहेब गालफाडे, गौरव राठोड, श्रीनिवास निगडे, ऋषिकेश परदेशी, अभिमन्यू मैड यांच्याविरुद्ध शिवीगाळ, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मात्र, या मारहाणीच्या घटनेनंतर तुषार दामगुडे यांच्यावर चोहोबाजूंनी टीका होत असतानाच दामगुडे यांनी मारहाण का केली याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. तुषार दामगुडे, म्हणाले, चार ते पाच दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीच्या चर्चेत मी माझे मुद्दे मांडत असताना हनुमंत पवार यांनी मला शिवीगाळ केली होती.

अशातच काल एका वृत्तवाहिनीतील चर्चा संपवून बाहेर येताना "तू जास्त नक्षलवादी-नक्षलवादी करू नको, असे म्हणत शिवीगाळ करत नक्षलवाद्यांना तुला मारायला लावीन," अशी धमकी मला पवार यांनी दिली, त्यानंतर संबधित प्रकार घडल्याचं दामगुडे यांनी सांगितलं. शिवाय या धमकीच्या हेतूची चौकशी करावी, अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचंही ते म्हणाले.

तर हनुमंत पवार यांनी सांगितलं की, वृत्तवाहिनीवर चर्चासत्र झाल्यानंतर मी कार्यालयातून बाहेर पडत होतो. त्यावेळी दामगुडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मला शिवीगाळ करून बोलावले. 'तू भाजप आणि संघाला विरोध का करतो, हर्षवर्धन सपकाळ यांची बाजू का घेतो', असा जाब विचारत दामगुडे आणि त्यांच्या कार्यकत्यांनी मला मारहाण केल्याचा दावा पवार यांनी केला आहे.

नेमका वाद काय?

काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन सपकाळ यांनी न छत्रपती शिवाजी महाराज यांची टिपू सुलतानशी तुलना केली होती. यावरून मोठा राजकीय गदारोळ उडाला होता. या विषयावर एका वृत्तवाहिनीने चर्चासत्र आयोजित केले होते. तेव्हा दामगुडे आणि पवार यांच्यात जोरदार खडाजंगी झाली होती. त्यावरून समाज माध्यमांवर दोन्ही

बाजूंनी पडसाद उमटले होते. या घटनेनंतर हरियानामधील एका स्वच्छतागृहावर महापुरुषाचे छायाचित्र लावल्याच्या विषयावरून वाद सुरू झाला आहे. या संदर्भात चर्चासत्रासाठी सोमवारी एका वृत्तवाहिनीतर्फे त्यांना निमंत्रित केले होते. स्टुडिओमध्ये चर्चेनंतर पवार आणि दामगुडे दोघेही तेथून बाहेर पडले.

कार्यालयाबाहेर दामगुडे आणि त्यांचे सहकारी बोलत उभे होते. तेथे त्या दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यातून दामगुडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पवार यांना मारहाण केली. दरम्यान हनुमंत पवार यांना मारहाण केल्याच्या घटनेचा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी निषेध व्यक्त केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT