Pune News : नगर परिषद, नगरपंचायतींमधील निकालानंतर जिल्हा परिषदेच्या इच्छुकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. स्थानिक पातळीवर आपापल्या भागात निवडणुकीत सक्रिय असलेल्या इच्छुकांचे निवडणुकीवर लक्ष होते. जिल्हा परिषद आणि नगर परिषद, नगरपालिकांच्या निवडणुकांचे गणित वेगळे असले, तरी तरी सध्याच्या कलावरून पुढील रणनीती आखली जाणार, हे निश्चित आहे. निकालाच्या दुसऱ्या दिवसापासूनच राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजपसह जिल्हा परिषदेच्या तयारीसाठीच्या सर्वच पक्षांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठक घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
नगरपरिषद, नगरपालिका निवडणूक ही राज्यातील महाविकास आघाडीतील पक्षांसाठी चिंतेचा विषय ठरली आहे. अनेक तालुक्यांमध्ये अपेक्षित ताकद दाखवण्यात महाविकास आघाडी अयशस्वी ठरल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, बारामतीसारख्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा प्रभाव असलेल्या ठिकाणी केवळ एकच नगरसेवक विजयी झाला आहे. येथील पराभवाचे सखोल विश्लेषण करून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी नव्याने व्यूहरचना आखली जाणार असल्याचे पदाधिकारी खासगीत सांगतात.
दरम्यान, महाविकास आघाडी म्हणून तीन पक्ष जिल्हा परिषद, पंचायत समितीची निवडणूक लढणार आहेत. इतरांना सोबत घेतल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा यापूर्वीच महाविकास आघाडीमधील (MVA) घटक पक्षांच्या जिल्हा प्रमुखांनी पत्रकार परिषद घेऊन दिला आहे.
या निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांची संख्याही केवळ मर्यादित राहिली. तर, दुसरीकडे भाजपने (BJP) जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांचा प्रवेश घडवून आणला. त्यांच्याकडून या निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळालेले नाही. आता जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये अधिक सदस्य सभागृहात पाठविण्यासाठी भाजपकडून प्रयत्न केले जाणार आहेत. त्याबाबत पदाधिकाऱ्यांना सूचना करून जबाबदाऱ्या देण्यात येणार आहेत.
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेच्या ठरणार आहेत. नगर परिषदांच्या निकालातून मिळालेल्या संकेतांवर आधारित नव्याने रणनीती, बूथस्तरावरील समीकरणे आणि उमेदवारांची निवड याकडे पक्षांचे लक्ष राहणार आहे. इच्छुकांनी आपआपल्या पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीसाठी दावा केला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत जिल्ह्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे आधीच स्पष्ट दिसू लागली आहेत.
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांमध्ये काही आमदारांचा पक्षाला अपेक्षित असा प्रभाव पडलेला नाही. उलट शिरूर आणि भोर परिसरात पहिली पंचवार्षिक असलेल्या आमदारांनी सक्रिय सहभाग घेतल्याने त्यांच्या पक्षाला लाभ झाल्याचे दिसून आले. मात्र, दौंड व खेड तालुक्यांत आमदारांना त्यांच्या विचारसरणीचे नगराध्यक्ष निवडून आणण्यात अपयश आले. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये प्रत्येक आमदाराची भूमिका, त्यांची मतदारांवरील पकड आणि ते उमेदवारांना कितपत साथ देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.