Pune News : पुणे महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदासाठीच्या 10 पैकी 7 जागा सत्ताधारी भाजपच्या वाट्याला आल्या आहेत. या 7 ही जागांवर भाजपने पराभूत उमेदवारांना संधी न देता निष्ठावंतांना संधी दिली आहे. या 7 जणांनी सोमवारी (9 मार्च) रोजी अर्ज दाखल केले. या नावांवर शिक्कमोर्तब होताच आता भाजपमधील अंतर्गत राजकारणावरही चर्चा सुरु झाली आहे.
भाजपच्या वाट्याला आलेल्या 7 जगांसाठी तब्बल 400 जण इच्छुक होते. यातून 7 जणांची निवड करण्याची जबाबदारी स्थानिक नेत्यांवर होती. या निवडीत स्थानिक नेत्यांनी मोठ्या प्रमाणात आपल्या निकटवर्तीयांसाठी ताकद लावल्याचे पाहायला मिळाले. यात मंत्री माधुरी मिसाळ आणि आमदार हेमंत रासने यांनी बाजी मारल्याचे चित्र आहे.
7 नावांमध्ये पर्वती आणि कसबा मतदारसंघातून प्रत्येकी 2 आणि पुणे कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर आणि कोथरूड या मतदारसंघातून प्रत्येकी एका कार्यकर्त्याला संधी दिलेली आहे. खडकवासला मतदारसंघात भाजपचाच आमदार असूनही त्या ठिकाणी कार्यकर्त्याला संधी मिळालेली नाही. शिवाय विधानपरिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्याही कार्यकर्त्याला डावलल्याची चर्चा आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघातून उदय लेले यांना संधी देण्यात आले आहे. लेले हे अनेक वर्ष पक्ष संघटनेत सक्रिय आहेत. त्यांना यंदा उमेदवारी देण्यात येणार होती. मात्र दिवंगत मुक्ता टिळक यांचे सुपुत्र कुणाल टिळक यांना उमेदवारी जाहीर केल्याने त्यांना उमेदवारी मिळाली नसल्याचे सांगितले जाते. लेले यांना आता स्वीकृत सदस्य म्हणून महापालिकेत आणले आहे.
कसब्यातीलच राजेंद्र काकडे यांनाही स्वीकृत सदस्य करण्यात आले आहे. काकडे यांच्या पत्नीला भाजपने एबी फॉर्मसह उमेदवारी दिली होती. मात्र ऐनवेळी उमेदवाराची समीकरणे बदलल्याने त्यांची उमेदवारी मागे घेण्यात आली. त्यामुळे आमदार हेमंत रासने यांनी दोन्ही नेत्यांचे नाव लावून धरलं. अखेर त्यांना स्वीकृत नगरसेवक पदी संधी मिळाली असल्याचे बोलले जात आहे.
दुसरीकडे पर्वती विधानसभा मतदारसंघातून मंत्री माधुरी मिसाळ यांच्या सोबत काम करणाऱ्या दोन भाजप कार्यकर्त्यांना स्वीकृत नगरसेवक पदी संधी देण्यात आली आहे. त्यातील विश्वास ननावरे हे भाजपला प्रतिकूल असणाऱ्या वस्ती भागात अनेक वर्ष काम करत असून ते आमदार माधुरी मिसाळ यांचे निकटवर्तीय मानले जातात.
तर माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे यांना यंदा महानगरपालिकेच्या निवडणुकीत दरम्यान उमेदवारी नाकारण्यात आली होती. त्या आपल्या मुलीच्या उमेदवारीसाठी आग्रही होत्या. मात्र ऐनवेळी शहराध्यक्षांच्या निकटवर्तीय व्यक्तीला ही उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे त्यांच्या मुलीला स्वीकृत नगरसेवक पदी संधी देण्यात आले असल्याचं बोलत आहे.
पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांचे निकटवर्ती असलेल्या निलेश कोंढाळकर यांना देखील स्वीकृत नगरसेवक पदाची संधी मिळाली आहे. महापालिका निवडणुकीत त्यांची उमेदवारी फिक्स मानली जात होती. मात्र पक्षाने आमदार आणि खासदारांच्या कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतल्याने त्यांना संधी मिळू शकली नव्हती.
पुणे कॅन्टोन्मेंट भागातून जयप्रकाश पुरोहित यांना संधी देण्यात आली आहे. त्यांच्या दोन पिढ्या भाजपमध्ये सक्रिय असल्याचे सांगितले जात आहे. तर शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून रवींद्र साळेगावकर यांना स्वीकृत पदी संधी देण्यात आली आहे. स्थानिक आमदार सिद्धार्थ शिरोळे हे त्यांच्यासाठी आग्रही होते असे सांगितले जात आहे.
त्याचवेळी खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांच्या मतदारसंघातूनही काही नावं चर्चेत होती. मात्र यंदा तरी त्या ठिकाणी कोणालाही संधी देण्यात आली नाही. हडपसरचे माजी आमदार आणि विधानपरिषदेचे विद्यमान आमदार योगेश टिळेकर यांच्याही कोणत्या कार्यकर्त्याचा विचार झालेला नाही. त्यामुळे या दोघांची ताकद कमी पडली का अशी देखील चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.