Vedant Agarwal Sarkarnama
पुणे

Pune Porsche Accident News : पब चालविणे गंमत आहे का? न्यायालयाचे खडेबोल; नेमकं काय घडलं?

Pune Court On Porsche Accident : पुणे न्यायालयानं आरोपी पब-बार चालक कर्मचाऱ्यांना 24 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Akshay Sabale

Pune Court On Porsche Accident, 22 May : पब चालविणे गंमत आहे का? मद्य पिऊन तरूण मुले बाहेर जाऊन दुचाकी, चारचाकी चालविणार हे पबचालकांच्या लक्षात आलं पाहिजे. पादचारी, वाहनचालकांची सुरक्षा महत्वाची आहे, अशा शब्दांत पुणे सत्र न्यायालयाने न्यायाधीश एस. पी. पोंक्षे यांनी मंगळवारी ( ता. 21 ) बचावपक्षांच्या वकिलांना खडसावलं.

कल्याणीनगर अपघातप्रकरणी मुंढवा येथील कोझी हॉटेल अँड बारचे मालक प्रल्दाद भुतडा, नमन भुतडा आणि व्यवस्थापक सचिन काटकर आणि हॉटेल ब्लॅकचे व्यवस्थापक संदीप सांगळे, बार काउंटर जयेश बोनकरविरुद्ध मोटारवाहन अधिनियम 1988 चे कलम 3,5, 199 ( अ ) न अल्पवयीन न्याय ( मुलांची काळजी व संरक्षण कायदा 2015 ) कलम 77, 75 नुसार येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मंगळवारी पोलिसांनी हॉटेल कोझीचे मालक नमन भुतडा, सचिन काटकर, संदीप सांगळे यांना न्यायालयात हजर केले होते. न्यायालयानं 24 पर्यंत त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. यावेळी न्यायालयानं चांगलीच खरडपट्टी काढली आहे.

न्यायालयात काय घडलं?

बचाव पक्षाचे वकील एस. के. जैन यांनी म्हटलं, "आरोपींनी मुलांना मद्य दिल्याचा आरोप आहे. पोलिसांनी जे कलम लावले ते अदखलपात्र आहे. त्यात सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा असून अटकेची गरज नाही."

"खातरजमा न करता त्यांना मद्य देण्यात आले"

सरकारी वकील विद्या विभुते न्यायालयात म्हणाल्या, "मुलगा हा अल्पवयीन असताना त्याचे वय न पाहता त्याला दोन बारमध्ये मद्य दिले गेले. वयाची कोणती खातरजमा न करता त्यांना मद्य देण्यात आले. ब्लॅक क्लबमध्ये नोंदणीकृत व्यक्तींना प्रवेश दिला जातो.

मात्र, आरोपीस कोणत्याही मेंबरशिपशिवाय प्रवेश देण्यात आला. याची चौकशी करणं आवश्यक आहे. मद्य पिण्याबाबत कोणते रेकॉर्ड दिले गेले तपासणे गरजेचे आहे. आरोपी मुलाशिवाय अन्य मुलांना कशाप्रकारे प्रवेश दिला गेला, हे देखील तपासले पाहिजे."

"पब चालवणे गंमत आहे का?"

सरकारी आणि बचाव पक्षाची बाजू ऐकल्यानंतर न्यायाधीस पोंक्षे यांनी म्हटलं, "संबंधित प्रकरण गंभीर आणि दुर्मिळ आहे. या गुन्ह्यात एकूण सहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात जे पुरावे मिळाले ते वस्तुस्थितीदर्शक आहेत. पब चालवणे गंमत आहे का?

मद्य पिऊन तरूण मुले बाहेर जाऊन दुचाकी-चारचाकी चालवत जाणार, हे पब चालकांच्या लक्षात आलं पाहिजे. रस्त्यावरचे पादचारी आणि वाहनचालकांची सुरक्षा महत्वाची आहे. त्यामुळे पबकडे केवळ व्यवसाय म्हणून त्याकडे पाहू नये. कोणी जास्त मद्य प्यायले असेल, तर त्यांची त्याच ठिकाणी झोपण्याची व्यवस्था करा."

"...अन्यथा पबला टाळे लावा"

"पबमध्ये दारू पिऊन बाहेर गेल्याची त्याची जबाबदारी ही पबचालकांची आहे. पबमध्ये बालकांना की सज्ञान व्यक्तीला दारू दिली जाते, हे पाहण्यासाठी स्वतंत्र व्यक्ती ठेवा. अन्यथा पबला टाळे लावा. या परिस्थितीत कुठेतरी बदल झाला पाहिजे. पबमध्ये किती दारू द्यायची ही मर्यादा ठरवली जावी," असं म्हणत न्यायालयानं बचाव पक्षाच्या वकिलांना खडेबोल सुनावले आहेत.

तकलादू कलमे लावली

कल्याणीनगर प्रकरणात वकील असीम सरोदे आणि वकील श्रिया आवले यांनी सारंग यादवाडकर यांच्यामार्फत हस्तक्षेप अर्ज दाखल केला आहे. एकाच अपघाताच्या घटनेसाठी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करणे ही पोलिसांनी केलेली चूक आहे. पब चालकाने अल्पवयीन मुलाला मद्य पिण्याची परवानगी दिली नसती, तर त्यानं बेधुंद पद्धतीनं कार चालवून दोघांचा जीव घेणारा अपघात केला नसता.

या अपघात प्रकरणी मुद्दामन तकलादू स्वरूपाची कलमे लावून गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी नोंदविलेला गुन्हा कायद्यासमोर समानतेच्या तत्वाला पायदळी तुडविणार आहे. श्रीमंत व्यक्तीच्या मुलाला वेगळा न्याय देण्याची प्रक्रिया आहे, असं पोलिसांचे वागणे आहे, अशी प्रतिक्रिया सरोदे यांनी व्यक्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT