Pune Crime Sarkarnama
पुणे

Pune police raid : गांजा, हुक्का अन् मद्यधुंद तरुण; लोणीकंदमधील 'प्रोजेक्ट एक्स' पार्टीची ए टू झेड माहिती थेट पोलिसांकडून!

Police action News : आळंदी-मरकळ रस्त्यावरील या रिसॉर्टवर सुरू असलेल्या अनधिकृत कथित रेव्ह पार्टीवर 15 अधिकारी आणि 65 हवालदारांच्या पथकाने छापा टाकला.

Sudesh Mitkar

Pune News : प्रोजेक्ट 'एक्स' या नावाने आयोजित केलेल्या पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रविवारी सकाळी लोणीकंद हद्दीत धडक कारवाई केली. आळंदी-मरकळ रस्त्यावरील या रिसॉर्टवर सुरू असलेल्या अनधिकृत कथित रेव्ह पार्टीवर 15 अधिकारी आणि 65 हवालदारांच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईदरम्यान पोलिसांना 107 पुरुष आणि 49 महिलांसह 3 अल्पवयीन तरुण मद्यधुंद अवस्थेत आढळले. या धडक कारवाईत पोलिसांनी पार्टीचा मुख्य आयोजक यश चौधरीला ताब्यात घेतले आहे.

या छाप्यात पोलिसांनी अंदाजे 85 लाख रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त केला. ज्यामध्ये 9 लाख 22 हजार रुपये किमतीचा बेकायदेशीर दारूसाठा, 3 ग्रॅम गांजा आणि प्रतिबंधित हुक्क्याचे साहित्य समाविष्ट आहे. पार्टीसाठी दिलेला दारूचा परवाना केवळ आदल्या रात्री 23:30 वाजेपर्यंतच वैध होता, तरीही नियमांचे उल्लंघन करून मध्यरात्रीनंतरही पार्टी सुरू ठेवण्यात आली होती. याप्रकरणी आयमान शेख आणि यश चौधरी या मुख्य आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिकचा तपास करत आहेत.

याबाबत अप्पर पोलीस आयुक्त तेजस्विनी सातपुते यांनी माहिती देताना सांगितले की, 'लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये, तुळापूर परिसरामध्ये मध्यरात्री एक पार्टी सुरू असून ती परवानगीशिवाय आणि अवैध पद्धतीने सुरू आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याच्यावरून याठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. कारवाईच्या दरम्यान याठिकाणी १०० हून अधिक मुले-मुली आणि येथील सगळे ऑर्गनायझर्स उपस्थित होते.'

त्यांच्याकडे त्यांनी कुठली परवानगी वगैरे घेतली आहे का? ह्याची पडताळणी केली असता असे लक्षात आले की, एक्साईजची त्यांनी दिनांक 6 रोजी 1 वाजल्यापासून ते रात्री 11:30 वाजेपर्यंतची परवानगी त्यांच्याकडे होती. परंतु ती परवानगी संपल्यानंतर देखील त्यांनी या ठिकाणी दारूची पार्टी ही कंटिन्यू केल्याचे आढळले आहे. त्याच्यामध्ये काही मुले हे वय वर्षे 21 च्या आतील असण्याची शक्यता असून त्याची तपासणी करून घेत आहोत. तसेच या प्रकरणी पार्टीसाठी ठिकाण ज्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे, त्यांचा त्याच्यात काय रोल आहे, त्यांनी अशा रीतीने 11:30 पर्यंतची परवानगी असतानाही त्यांनी पार्टी सुरू ठेवली आहे का? याचा तपास सुरू आहे.

पार्टीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दारू सापडली असून त्याची किंमत लाखांमध्ये आहे. एक्झॅक्ट कॉस्ट आता आम्ही एक्साईजकडून काढून घेत आहोत. दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्याने कोणते नियम भंग केले आहेत, त्या दृष्टीने तपास सुरु आहे. त्यामुळे BNS चे कलम 223, 270, 3(5) आणि 292 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्र प्रोहिबिशन ॲक्टचे देखील अनेक गोष्टींचं उल्लंघन झाल्यामुळे आपली प्रोहिबिशन ॲक्टप्रमाणे कारवाई सुरु आहे.

महाराष्ट्र पोलीस ॲक्टप्रमाणे 33 रीड विथ 131 (33 read with 131) प्रमाणे गुन्हा दाखल होत आहे. काही प्रमाणात या ठिकाणी गांजा आढळून आला असून इतर अमली पदार्थांचे सेवन या पार्टीमध्ये करण्यात आले का नाही याबाबतचा अधिक तपास करण्यात येत आहे. त्यासोबतच शंभरहून अधिक लोक या ठिकाणी कोणकोणत्या ठिकाणावरून आले होते. याबाबत देखील कसून चौकशी सुरू असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT