

Fraud Baba: नाशिकमधील स्वयंघोषित ज्योतिषी आणि आध्यात्मिक गुरु अशोक खरात याच्याकडून शेकडो महिलांचं लैंगिक शोषणाचं प्रकरण अद्यापही चर्चेत असताना याच मोडस ऑपरेंडीनं काम करणाऱ्या आणखी एका बाबाचा पर्दाफाश झाला आहे. हा बाबा उत्तर प्रदेशातल्या मथुरा इथला हा बाबा असून त्यानं IIT तून इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं आहे, त्यानंतर तो या फसव्या धंद्यात पडला. या ठिकाणी आध्यात्माच्या नावाखाली अनेक तरुणींना फसवून त्यांचं लैंगिक शोषण केलं. या बाबाविरोधात एका तरुणीनं तक्रार दिल्यानंतर स्थानिक पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
अभिषेक मिश्रा असं या भोंदूबाबाचं नाव असून खरात आणि त्याच्यामध्ये एक विशेष साम्य म्हणजे मिश्रा हा देखील खरात ज्या प्रमाणं आपल्या भक्तांना ओश्नोजल नामक द्रव्य प्राशन करायला द्यायचा तसाच प्रकार या मिश्रानं देखील केला आहे. तो गुंगी आणणारं दूध तरुणींना प्राशन करायला द्यायचा. हे दुध प्यायल्यानंतर गुंगी येऊन महिला बेशुद्ध पडायच्या त्यानंतर तो त्यांच्यावर अत्याचार करत होता. यानंतर याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करुन तो या महिलांना ब्लॅकमेल करायचा आणि वारंवार त्यांच्याकडून अशी कृत्ये करुन घ्यायचा अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
विविध माध्यमातील वृत्तांनुसार, IIT रुडकी इथून २०१७-२१ या कालावधीत या अभिषेक मिश्रा नामक बाबानं मॅकेनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं आहे. मुळचा ओडिशाचा रहिवासी असून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यानं नोकरी करण्याचा मार्ग निवडला नाही तर ऑनलाईन पद्धतीनं त्यानं भगवदगीतेवर धार्मिक प्रवचन द्यायला सुरुवात केली. काही वर्षांमध्ये तो तरुण प्रवचनकार म्हणून तरुण-तरुणींमध्ये प्रसिद्ध झाला, कारण तो आध्यात्म आणि आधुनिक शिक्षण यांची सांगड घालून प्रवचन द्यायचा. त्याच्या संपर्कात प्रामुख्यानं इंजिनिअरिंगच्या मुलीच यायच्या, ज्या बीटेक एमटेक सारखं शिक्षण घेणाऱ्या होत्या. यांपैकी अनेक तरुणी या उच्चशिक्षित कुटुंबातून आलेल्या होत्या. पण विशेष करुन तो अशाच मुलींना टार्गेट करायचा ज्या भावनिक, मानसिक आणि आध्यात्मिकरित्या अडचणीत असतील. सुरुवातीला त्यांचा विश्वास संपादन केल्यानंतर त्यांन हळूहळू कुटुंबापासून दूर जाण्याचा सल्ला दिला जायचा आणि या बाबाच्या ग्रुपमध्ये त्याच्या घरीच राहायला यायला सांगायचा. अनेक तरुणी विश्वासानं त्याचा सल्ला घ्यायच्या, पण आपल्या प्रभावशाली बोलण्यात गुंतवून तो या तरुणींना गोवर्धन येथील आपल्या घरी बोलावयचा.
दरम्यान, एका पीडितेनं त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा झाला. या तरुणीच्या तक्रारीनुसार, अभिषेक मिश्रा हा त्या तरुणींना जाळ्यात अडकवायचा ज्यांचा गंधर्व विवाह झाला आहे. याच्या आधारेच तो त्यांच्याशी शाररिक संबंध ठेवायचा. यांपैकी एका पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अभिषेक मिश्राविरोधात महिलांचं लैंगिक शोषण प्रकरणी गुन्हा दाखल करुन त्याला अटकही केली. त्यानं अशाच प्रकारे आणखी किती मुलींवर अत्याचार केले आहेत का? याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
यापूर्वीही अभिषेक मिश्रा हा वादात अडकला आहे, कारण सहा महिन्यांपूर्वी एक कुटुंब आपल्या मुलीला त्याच्याजवळून परत नेण्यासाठी आलं होतं, त्यावेळी देखील मोठा गोंधळ झाला होता. त्यावेळी हे प्रकरण जास्त पुढे गेलं नाही पण पोलिासांना संशय आला होता की या ठिकाणी काहीतरी काळबेरं घडत असावं. कारण त्यानंतर काही शेजारच्या लोकांनी असंही सांगितलं होतं की, एकदा तर त्याच्या घरी दहा-बारा मुली दिसून आल्या होत्या. पण नंतर अनेक जण तिथून निघून गेले होते. त्यामुळं आता पोलीस याचाही तपास करत आहेत की इतके लोक त्याच्या घरी आध्यात्म शिकायला येऊन का परतले असावेत. काही मुलींच्या कुटुंबियांनी पोलिसांना मोबाईलमधील काही फोटो आणि व्हिडिओ देखील सुपूर्द केले आहेत. यामध्ये हा अभिषेक मिश्रा या मुलींसोबत आक्षेपार्ह स्थितीत दिसून येत आहे. पण हे सर्व सत्यापित करण्याचं काम पोलिसांकडून सुरु आहे. त्याची फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.