Pune District Hospital: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पुणे जिल्हा रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर २४ तास होत नाही तोच औंध येथील जिल्हा रुग्णालयातील बिघडलेल्या रुग्णसेवेची दखल केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतली आहे. त्यांनी रुग्णालय प्रशासनाला तसे पत्र पाठवले आहे. रुग्णांच्या उपचाराबाबत अनेक गंभीर बाबींकडे लक्ष वेधत त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना पत्र पाठवत विविध त्रुटी दूर करून १५ दिवसांत त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
विशेष म्हणजे, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी नुकतीच जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली होती. त्यावेळी त्यांना आरोग्यसेवेची झालेली दुरावस्था दिसली नाही का, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. येथील अधिकाऱ्यांनी सर्व काही अलबेल असल्याचे दाखवत थेट मंत्री आबिटकर यांनाच कसे गुंडाळले याचीही चर्चा यानिमित्ताने होत आहे. आबिटकर यांचा दौरा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी येथील रुग्ण व्यवस्थेचे वाभाडे काढणारे पत्र काढल्याने आता आरोग्य विभागात चर्चा सुरू झाली आहे.
मोहोळ यांनी पाठविलेल्या पत्रात शवागारातील शवपेट्यांची दुरवस्था, अपुरी अतिदक्षता सुविधा, नवजात बालक विभागातील कमी कार्यरत खाटा, डायलिसिस विभागातील निर्जंतुकीकरणाबाबतच्या तक्रारी तसेच रात्रीच्या वेळी गंभीर रुग्णांना अन्य रुग्णालयांत वारंवार पाठविण्याच्या प्रकारांचा उल्लेख करण्यात आला आहे. शवागारातील उपलब्ध दोन शवपेट्या खराब अवस्थेत असून त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आवश्यक असल्यास येरवडा मानसिक रुग्णालयातील अतिरिक्त शवपेट्या तात्पुरत्या स्वरूपात उपलब्ध करून देण्याची सूचनाही करण्यात आली आहे. कोविड काळात उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्रकल्पाचा क्षयरोग रुग्णालयासाठी प्रभावी वापर करून बाहेरून ऑक्सिजन खरेदीवरील अवलंबित्व कमी करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
रुग्णालयातील विशेष नवजात अतिदक्षता विभागाची (एसएनसीयू) मंजूर क्षमता २४ खाटांची असताना केवळ १२ खाटा कार्यरत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. या सर्व खाटा तातडीने कार्यान्वित करण्याबरोबरच पुरुष व महिला रुग्णांसाठी स्वतंत्र अतिदक्षता सेवा उपलब्ध होण्यासाठी दोन्ही आयसीयू पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय व्हेंटिलेटर आणि आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे, मंजूर दहा खाटांचे भाजलेल्या रुग्णांसाठीचे (बर्न) वॉर्ड तातडीने सुरू करणे आदी मागण्यांचाही पत्रात समावेश आहे.
नवनियुक्त जिल्हा शल्यचिकित्सकांसमोर आव्हान
जिल्हा रुग्णालय हे समस्यांचे आगार बनले आहे. डॉक्टर वेळेवर येत नाहीत. रुग्णांना आरोग्य सुविधा मिळत नाहीत. डॉक्टरांवर जिल्हा शल्यचिकित्सकांचा वचक राहिलेला नाही. तर, येथील एका वर्ग चार सराईत कर्मचाऱ्याला वरिष्ठ अधिकाऱ्याने जवळ केल्याने जणुकाही तोच रुग्णालय चालवत असल्याच्या अविर्भावात वावरत आहे. या पुर्वीच्या जिल्हा शल्यचिकित्सकांनी केलेल्या रुग्णालयाकडील दुर्लक्षाने ही अवस्था झाली असून त्याला आताचे नवनियुक्त जिल्हा शल्यचिकित्सक ही परिस्थिती कशी बदलतात हे पाहणे महत्वपुर्ण ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.