Pune IT engineer Dowry Case : पुण्यात हुंडाबळींच्या घटना थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे पुण्यातील हुंडाबळींचा मुद्दा चर्चेत आला होता. या घटनेमुळे पुण्यासह राज्यातील वातावरण तापले होते. अशातच आता पुण्यातील वडाचीवाडी येथील एका विवाहितेने लग्नाला अवघे चार महिने झाले असतानाच सासरच्या लोकांच्या त्रासाला कंटाळून आपले आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
वैष्णवी ओंकार गिसरे असे मृत तरुणीचे नाव आहे. या घटनेनंतर तिच्या माहेरच्या मंडळींनी सासरच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. वैष्णवीचे वडील प्रवीण रघुनाथ जरांडे यांनी याप्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, वैष्णवीचा पती, सासू आणि सासरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हुंड्यासाठी तिचा मानसिक तसेच शारीरिक छळ केला जात असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, वैष्णवी आणि ओंकार गिसरे यांचा विवाह ९ मे २०२६ रोजी झाला होता. लग्नावेळी माहेरच्या कुटुंबीयांनी सुमारे ४५ लाख रुपये खर्च केले होते. याशिवाय १० तोळे सोनेही दिल्याचे तिच्या वडिलांनी तक्रारीत नमूद केले आहे.
मात्र, विवाहानंतर काही दिवसांनीच चारचाकी वाहन घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणण्याची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. या पैशांसाठी वैष्णवीवर वारंवार दबाव टाकला जात होता. त्यातून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आल्याचे तिच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले.
दरम्यान, गुरुवारी रात्री वडाचीवाडी येथील वृंदावन सोसायटीमधील राहत्या घरात वैष्णवीने गळफास घेतल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी वैष्णवीचे पती ओंकार गिसरे, सासरे संजय महादेव गिसरे आणि सासू रुपाली गिसरे यांच्याविरोधात हुंडा प्रतिबंधक कायदा तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास काळेपडळ पोलीस करत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.