Voting Rules Sarkarnama
पुणे

Voting Rules: पुणे पदवीधर-शिक्षक निवडणूक: मतदानात 'ही' चूक पडेल महागात; अशी आहे योग्य पद्धत

Pune Graduate Teacher Election: पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मतपत्रिकेवर पहिली पसंती आकड्यांत नोंदवणे आवश्यक आहे. चुकीची खूण, दुसरे पेन किंवा स्वाक्षरीमुळे मत अवैध ठरू शकते.

Sudesh Mitkar

Pune Graduate Teacher Election News : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत मतदान करताना मतदारांना नेहमीच्या निवडणुकांप्रमाणे उमेदवाराच्या नावासमोरील बटण दाबता येणार नाही किंवा खूणही करता येणार नाही. या निवडणुकीत मतपत्रिकेवर उमेदवारांच्या नावासमोर पसंतीक्रम नोंदवावा लागणार आहे. मतदानातील एखादी छोटी चूकही मतपत्रिका अवैध ठरवू शकते. त्यामुळे प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांसह सर्वांनी मतदानाची पद्धत समजून घ्यावी, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केले आहे.

पहिल्या पसंतीचा ‘एक’ आकडा महत्त्वाचा

मतदाराने आपल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरील रकान्यात ‘१’ हा आकडा लिहून पहिली पसंती नोंदवणे अनिवार्य आहे. हा आकडा केवळ एका उमेदवाराच्या नावासमोरच लिहिता येईल. त्यानंतर इच्छेनुसार दुसऱ्या, तिसऱ्या आणि पुढील पसंतीचे क्रमांक नोंदवता येतील. सर्व उमेदवारांना पसंतीक्रम देणे बंधनकारक नसले, तरी पहिली पसंती स्पष्टपणे नोंदवणे आवश्यक आहे.

टिकमार्क, ‘एक-दोन’ शब्द लिहिल्यास मत बाद

मतदानासाठी निवडणूक अधिकाऱ्याने दिलेले जांभळ्या रंगाचे स्केच पेनच वापरावे लागणार आहे. अन्य पेन, पेन्सिल किंवा बॉलपेनने पसंतीक्रम नोंदवल्यास मतपत्रिका अवैध ठरू शकते. उमेदवाराच्या नावासमोर टिकमार्क (√) किंवा ‘एक्स’ (X) अशी खूण करणेही ग्राह्य धरले जाणार नाही. पसंतीक्रम शब्दांत न लिहिता आकड्यांतच नोंदवावा लागेल.

मतपत्रिकेवर नाव किंवा सही नको

मतदाराने मतपत्रिकेवर स्वतःचे नाव, आद्याक्षरे, स्वाक्षरी किंवा अन्य कोणताही मजकूर लिहू नये. अंगठ्याचा ठसाही उमटवू नये. मतदाराची ओळख पटू शकेल अशी खूण आढळल्यास मतपत्रिका अवैध ठरू शकते.

या चुका टाळा; अन्यथा मत वाया जाण्याची शक्यता

कोणत्याही उमेदवारासमोर ‘१’ हा आकडा न लिहिणे.

एकापेक्षा अधिक उमेदवारांना ‘१’ हा पसंतीक्रम देणे.

एकाच उमेदवारासमोर ‘१’ आणि त्यासोबत इतर पसंतीक्रमही लिहिणे.

कोणत्या उमेदवाराला पसंती दिली आहे, याबाबत संदिग्धता निर्माण होईल अशा पद्धतीने आकडा लिहिणे.

पसंतीक्रम आकड्यांऐवजी शब्दांत लिहिणे.

निवडणूक अधिकाऱ्याने दिलेल्या जांभळ्या स्केच पेनऐवजी अन्य लेखनसाधन वापरणे.

मतपत्रिकेवर नाव, सही, अंगठ्याचा ठसा किंवा ओळख पटवणारी खूण करणे.

एकूण उमेदवारांपैकी एका उमेदवाराला ‘१’ हा पसंतीक्रम देणे आवश्यक आहे. पुढील पसंतीक्रम देणे मात्र मतदाराच्या इच्छेवर अवलंबून आहे. त्यामुळे मतदान करताना घाई न करता सूचना काळजीपूर्वक वाचून मतपत्रिका भरावी, असे आवाहन निवडणूक प्रशासनाने केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT