Dasara Melava : पंकजा मुंडे, मनोज जरांगे पाटील अन् सुरेश धस यांच्या दसरा मेळाव्याने बीडमधील राजकीय वातावरण तापले; तिघांच्या भाषणाकडे लक्ष

Beed Dasara Melava: बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे, मनोज जरांगे पाटील आणि सुरेश धस यांच्या दसरा मेळाव्यांची तयारी पूर्ण झाली आहे. मराठवाड्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर तिन्ही नेत्यांच्या भाषणांकडे लक्ष लागले आहे.
Dasara Melava
Dasara MelavaSarkarnama
Published on: 
Updated on: 

Beed Politics News: मराठवाड्यात दुष्काळाचे संकट गडद झाले असताना बीड जिल्ह्यात विजयादशमीच्या निमित्ताने तीन वेगवेगळ्या ठिकाणी दसरा मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. सावरगाव घाट येथील भगवान भक्तीगडावर भाजप नेत्या पंकजा मुंडे, नारायणगडावर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि आष्टी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ गडावर आमदार सुरेश धस यांच्या उपस्थितीत मेळावे होणार आहेत. या तिन्ही नेत्यांच्या भाषणांतून कोणते मुद्दे मांडले जातात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

भगवान भक्तीगड, नारायणगड आणि नव्याने चर्चेत आलेला मच्छिंद्रनाथ गड या तिन्ही ठिकाणी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने मोठे शक्तीप्रदर्शन होणार आहे. ​पाटोदा तालुक्यातील सावरगावघाट येथील श्रीक्षेत्र भगवान भक्तीगडावर विजयादशमीनिमित्त होणाऱ्या दसरा मेळाव्याची तयारी पूर्ण झाली आहे. महायुती सरकारमधील मंत्री तथा भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या मेळाव्यासाठी हजारोंची गर्दी जमणार आहे.

यासाठी तब्बल ११० एकर क्षेत्रावर विस्तीर्ण पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रशासनाकडून आणि पोलिसांकडून सुरक्षेचा सविस्तर आढावा घेण्यात आला आहे. उन्हाचा त्रास होऊ नये आणि लाखो नागरिकांची तहान भागवण्यासाठी भक्तगण व ग्रामस्थांच्या वतीने चक्क २ लाख पाण्याच्या बाटल्यांचे मोफत वाटप व नियोजन करण्यात आले आहे. मैदान समतल करणे, पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय आणि कडक सुरक्षा व्यवस्थेवर विशेष भर देण्यात आला आहे.

दुसरीकडे, बीडच्याच शिरूर कासार तालुक्यातील ऐतिहासिक नारायणगडावर मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दसरा मेळावा पार पडत आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून मराठा समाज आणि तरुण वर्गाचे महाशक्तिप्रदर्शन पाहायला मिळणार आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठीचे आपले आंदोलन स्थगित करत सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिला आहे. त्यानंतर त्यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. त्यांच्या जवळच्या लोकांना त्रास दिला जात असल्याचा आरोप केला जात आहे. अशावेळी ते नेमकं समाज बांधवांना काय आवाहन करतात? याकडे राज्याचे लक्ष असणार आहे.

Dasara Melava
Beed News: बोगस शिक्षक मान्यता घोटाळा प्रकरणात परळीच्या शाळेतील पाच जणांवर कारवाईचा बडगा

अतिवृष्टीमुळे गेल्यावेळी मेळावा रद्द, पण दुष्काळात घेणार

गेल्यावेळी बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले होते. शेती खरवडून गेली होती, तर पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली होती. या पार्श्वभूमीवर मच्छिंद्रनाथ गडावर होणारा दसरा मेळावा आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केला होता. मात्र यंदा मराठवाड्यात कोरडा दुष्काळ असताना मात्र धस यांनी स्वतंत्रपणे मेळावा घेण्याचा निर्णय घेत तशी तयारी देखील केली. नाथ संप्रदायाचे समृद्ध परंपरा पुढे नेणे,भाविकांमधील श्रद्धा वाढवणे या उद्देशाने मेळाव्याचे आयोजन केल्याचे त्यांच्याकडून सांगीतले जाते. गेल्या वर्षी खंड पडल्यानंतर यंदा सुरेश धस काय बोलतात? याकडेही सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

Dasara Melava
Gokul Election Result : मोठी बातमी! शौमिका महाडिक पराभूत, 'गोकुळ'मध्ये धक्कादायक निकाल, सतेज पाटलांची बाजी!

धनंजय मुंडे यांची दोन्ही गडांवर असणार हजेरी

​एकीकडे राजकीय संघर्ष आणि तीन मेळाव्यांची रणधुमाळी उडाली असताना, माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे हे मात्र दोन्ही गडांवर हजेरी लावणार आहेत. विचारांचे सोने लुटण्यासाठी मी येतोय, तुम्हीही या असे आवाहन त्यांनी केले असून, दसऱ्याच्या दिवशी सकाळी ते भगवान गडावर जाऊन संत भगवान बाबांच्या समाधीचे दर्शन घेतील व महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतील. त्यानंतर ते दुपारच्या सत्रात सावरगाव येथे खासदार पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या भव्य दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com