Pune Hit and Run Case : पुण्यातील पॉश एरिया अशी ओळख असलेल्या कल्याणीनगर भागात घडलेल्या पोर्श कारच्या अपघातामध्ये दोन अभियंत्यांचा जागीच मृत्यू झाला. बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांच्या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने गाडी चालवून एका दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील दोन जणांना जागीच मृत्यू झाला. रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास हा दुर्दैवी प्रकार घडला.
या दुर्घटनेनंतर या अल्पवयीन मुलाला सुरूवातीच्या काळात बालहक्क न्याय मंडळाने (Child Rights Justice Board) जामीन मंजूर केला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठा रोष पसरला होता. सोशल मिडीयावर यावरून उलटसुलट चर्चा देखील सुरू झाली होती. श्रीमंताच्या मुलांना अशी वागणूक दिल्याप्रकरणी पोलिसांच्या कारभारावर देखील मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
देशभरातील विविध भागातील नागरिकांकडून या घटनेवर कडक शब्दात नाराजी व्यक्त केली जात होती. राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DEVENDRA FADANVIS) यांनी तातडीने पुणे पोलिस आयुक्तालयात सप्राईज व्हिजिट करत या प्रकरणाची माहिती घेत पोलिसांना कडक कारवाईचे आदेश देखील दिले होते. तसेच या अल्पवयीन मुलाला दिलेला जामीन रद्द करण्यासाठी बालहक्क न्यायमंडळाकडे धाव घेत अर्ज दाखल केला होता.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या अपघातानंतर सर्वसामान्य नागरिकांमध्ये उठलेला जनप्रक्षोभ लक्षात घेत आणि पोलिसांनी सादर केलेल्या नवीन पुराव्यांचा आधार घेत बालहक्क न्यायालयाने या आरोपीचा जामीन रद्द करून त्याला 14 दिवसांसाठी बालसुधारगृहात पाठविण्याचा निर्णय दिला आहे.
ज्या पोर्श गाडीने हा अपघात झाला. त्याची नोंदणी देखील आरटीओमध्ये झाली नव्हती. असे असतानाही ही गाडी गेल्या काही महिन्यांपासू सर्रासपणे रस्त्यावर फिरत असल्याची माहिती तपासात समोर आली होती. त्यामुळे आरटीओने महत्वाचे पाऊल उचलत या आलिशान पोर्श कारची नोंदणी तात्पुरती रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
या अपघातग्रस्त कारची तात्पुरती नोंदणी 18 मार्चला झाली होती. पुण्याच्या आरटीओत (RTO) कारच्या नोंदणीसह इतर शुल्क अशी 1 हजार 758 रुपयांची रक्कम न भरल्याने ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. या कारची मालकी असलेल्या ब्रह्मा कंपनीला याबाबत नोटीस देखील बजावली जाणार आहे.
कारची तात्पुरती नोंदणी रद्द झाल्यानंतर तिची पुढील 12 महिने नोंदणी करता येणार नाही, असेही आरटीओच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या कारचे शुल्क भरले गेले नसल्याने आरटीओने कारसाठी नोंदणी क्रमांक दिला नसल्याची माहिती समोर आली आहे.
कल्याणीनगर भागात भरधाव वेगाने गाडी चालवून दोन जणांचा बळी घेतलेल्या या अल्पवयीन आरोपीला पुढील काही वर्षे लायसन्स मिळू नये, यासाठी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. राज्य सरकारच्या परिवहन विभागाचे आयुक्तांसह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पातळीवर याबाबतची चर्चा सुरू असून लवकरच त्याचा अंतिम निर्णय घेतला जाईल, असे आरटीओच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.