Pune Jain Boarding Row: पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जागेच्या विक्रीचा वाद सध्या राज्यभर गाजतो आहे. या प्रकरणातील अनियमितता बाहेर आल्यानंतर अखेर बिल्डर गोखले कन्स्ट्रक्शननं हा २३० कोटींचा व्यवहार रद्द केला आहे. पण आता याप्रकरणात शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टनं मोठा घोळ घातल्याचं समोर आलं आहे. या ट्रस्टनं धर्मादाय आयुक्तांची दिशाभूल करुन जागेच्या विक्रीला मंजुरी मिळवल्याचं आता समोर आलं आहे. त्यामुळं या प्रकरणाला आणखीनं वेगळं वळणं मिळालं आहे.
पुण्यातील शिवाजीनगर भागातील मॉडेल कॉलनी परिसरातील ‘शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट’च्या १ हजार ४५२ चौरस फूट जागेत भगवान दिगंबर जैन महावीरांचे मंदिर असून, या मंदिरात जैन समाजाचे लोक दर्शनासाठी येत असतात, असा अहवाल धर्मादाय आयुक्तांकडे पुणे विभागाच्या सहआयुक्तांनी सादर केला आहे. पण ट्रस्टने बांधकाम व्यावसायिकास जागेची विक्री करण्यास परवानगी मागताना धर्मादाय आयुक्तांकडं केलेल्या अर्जात या मंदिराचा उल्लेख केला नव्हता असा आरोप ‘जैन बोर्डिंग बचाव कृती समिती’चे याचिकाकर्ते अॅड. सुकौशल जिंतूरकर व अॅड. योगेश पांडे यांनी केला होता. याची दखल घेत धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती यांनी ट्रस्ट जागेच्या आवारात जैन मंदिर आहे का? याची पाहणी करून २७ ऑक्टोबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश सहधर्मादाय आयुक्तांना दिले होते.
त्यानुसार, सहधर्मादाय आयुक्त रजनी क्षीरसागर यांनी आपला अहवाल धर्मादाय आयुक्तांना सादर केला. यामध्ये बोर्डिंगच्या जागेत भगवान महावीर यांचे मंदिर असल्याची खातरजमा केली आहे. १३ पानी अहवालासमवेत यासंदर्भात ४३१ पानांची कागदपत्रे अहवालात जोडण्यात आली आहेत.
सहधर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या निरीक्षकांनी पाहणीदरम्यान ट्रस्टच्या एका विश्वस्तांचा जबाब नोंदविला. त्यामध्ये जैन बोर्डिंगच्या पुनर्विकासादरम्यान मंदिराच्या कोणत्याही भागाला नुकसान पोहोचणार नाही तसेच ते हटविले जाणार नाही, असे आश्वासन विकसकाने दिले होते. ट्रस्ट आणि विकसक कंपनीमध्ये ८ ऑक्टोबरला झालेल्या जागेच्या विक्री करारनाम्याच्या कलम तीनमध्ये त्याचा उल्लेख आहे, असेही या अहवालात नमूद आहे.
दरम्यान, ट्रस्टने विकसकाला जागा विकण्यासाठी परवानगी मागताना ६५ वर्षे जुन्या जैन मंदिराचा उल्लेख केला नव्हता. ट्रस्टनं स्थापत्य अभियंता व मूल्यनिर्धारकामार्फत (व्हॅल्यूअर) १६ नोव्हेंबर २०२४ रोजी जागेचे मूल्यांकन केले होते. या मूल्यांकन अहवालातही जैन मंदिराचा कोणताही उल्लेख नव्हता. मात्र, आता धर्मादाय सहआयुक्तांनी केलेल्या पाहणीत या जागेत जैन मंदिर असल्याची खातरजमा झाली आहे. त्यामुळं ट्रस्टनं धर्मादाय आयुक्तांची दिशाभूल करून जागेच्या विक्रीला मंजुरी मिळविल्याचे सिद्ध झालं आहे, असं याचिकाकर्त्यांचे वकील अॅड. योगेश पांडे यांनी म्हटलं आहे.
- भगवान दिगंबर जैन महावीर यांची मूर्ती असलेले मंदिर एक हजार ४५२.११ चौरस फूट जागेत
- मंदिर सार्वजनिक न्यास कार्यालयात नोंदणीकृत नसले, तरी ट्रस्टच्या स्थावर मालमत्तेत असल्याने यावर त्यांची मालकी आहे.
- बोर्डिंगचे अधीक्षक व विद्यार्थी या मंदिराची देखभाल करतात
- मंदिराच्या कोणत्याही भागाला नुकसान होणार नाही याची हमी विकसकाने दिली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.