Pune JICA Project Sarkarnama
पुणे

Mula Mutha River: 990 कोटींच्या जायका प्रकल्पात ‘गावठी’ कारभार! चिखलात मलवाहिन्या, पोकलेनने पाइप ढकलले

Pune JICA Project News: पुण्यातील ९९० कोटींच्या जायका प्रकल्पात टिळक पुलाजवळ चिखलात मलवाहिन्या जोडल्याचे आणि रबर रिंग तुटल्याचे निदर्शनास आले. ठेकेदाराला नोटीस देऊन खराब पाइप बदलण्याचे प्रशासनाचे आश्वासन.

Sudesh Mitkar

Pune JICA Project News : मुळा-मुठा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी तब्बल 990 कोटी रुपये खर्चून राबविण्यात येणाऱ्या जायका प्रकल्पाच्या कामाच्या दर्जावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महापालिका भवनासमोरील टिळक पुलाजवळ नदीपात्रात 1600 मिलिमीटर व्यासाच्या मलवाहिन्या टाकताना खड्ड्यातील पाणी आणि चिखल न काढताच पाइपची जोडणी केली जात असल्याचे समोर आले आहे. त्यातच क्रेनऐवजी पोकलेनच्या साहाय्याने पाइप खड्ड्यात ढकलले जात असल्याचेही दिसून आले. त्यामुळे कोट्यवधींच्या प्रकल्पात कामाच्या गुणवत्तेचे निकष पाळले जात आहेत का, असा सवाल उपस्थित होत आहे.

विशेष म्हणजे, पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीपासून हाकेच्या अंतरावर हे काम सुरू आहे. तरीही कामाच्या दर्जावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेचे लक्ष कुठे आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मलवाहिन्यांच्या जोडण्यांमध्ये त्रुटी राहिल्यास भविष्यात सांडपाणी गळती होण्याचा धोका असून, नदी प्रदूषण रोखण्याच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

चिखलात पाइपची जोडणी; रबर रिंगही तुटली

टिळक पुलाजवळ मलवाहिन्या टाकण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी आणि चिखल साचल्याचे दिसून आले. पाइपचा काही भाग चिखलात बुडालेला असतानाच त्याची जोडणी केली जात होती. दोन पाइप जोडताना वापरण्यात येणारी रबराची रिंग तुटल्याचेही निदर्शनास आले आहे. जोडणीच्या ठिकाणी लावलेल्या सिमेंटला पुरेसे पाणी न मारल्याने त्याला भेगा पडल्याचेही दिसत आहे.

मलवाहिन्या टाकताना त्यांची पातळी योग्य राखणे आणि जोडणी मजबूत असणे आवश्यक आहे. मात्र, चिखल आणि पाण्याच्या उपस्थितीत जोडणी केल्याने कामाच्या दर्जाबाबत शंका निर्माण झाली आहे. जोडण्यांमधून सांडपाणी गळती झाल्यास त्याचा परिणाम पुन्हा नदीच्या प्रदूषणावर होऊ शकतो. दुसरीकडे, प्रशासनाने चिखलात खडी टाकून त्यावर मलवाहिन्या बसविल्याचा दावा केला आहे.

क्रेनऐवजी पोकलेनचा वापर; निविदेच्या अटींचे काय?

निविदेतील अटींनुसार मलवाहिन्या क्रेनच्या साहाय्याने उचलून नियोजित ठिकाणी व्यवस्थित बसविणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र पोकलेनच्या साहाय्याने पाइप ढकलून खड्ड्यात टाकले जात असल्याचे दिसून आले. पाइप हाताळण्याच्या या पद्धतीमुळे त्यांचे नुकसान होण्याची आणि जोडण्यांमध्ये त्रुटी निर्माण होण्याची शक्यता आहे.

जायका प्रकल्पासारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात कामाच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता तपासणी होणे अपेक्षित असताना, प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी अशा त्रुटी आढळल्याने देखरेख यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. कामाची गती आणि दर्जा या दोन्ही बाबींकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

ठेकेदाराला नोटीस; खराब पाइप बदलणार

या प्रकाराची दखल घेत प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता संजय गायकवाड यांनी संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. क्रेनऐवजी पोकलेनचा वापर करून पाइप टाकणे चुकीचे असल्याचे त्यांनी मान्य केले. तसेच कामातील त्रुटी दुरुस्त करण्यात येतील आणि खराब झालेले पाइप बदलण्यात येतील, असे आश्वासन दिले.

मात्र, नोटीस बजावण्यापलीकडे प्रशासन प्रत्यक्ष कामाच्या दर्जात सुधारणा घडवून आणणार का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. कारण नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या यंत्रणेतीलच काम निकृष्ट दर्जाचे राहिल्यास भविष्यात त्याच्या दुरुस्तीवर पुन्हा खर्च करण्याची वेळ येऊ शकते.

एसटीपीची कामे ९५ टक्के; मलवाहिन्यांचे काम मात्र संथ

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत जपानच्या जायका बँकेच्या अर्थसाहाय्याने हा प्रकल्प गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. प्रकल्पातील मैलापाणी प्रक्रिया केंद्रांची कामे ९५ टक्के पूर्ण झाली आहेत. मात्र, ५३ किलोमीटर लांबीच्या मलवाहिन्या टाकण्याचे उद्दिष्ट असताना आतापर्यंत केवळ २१ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे.

एकीकडे प्रकल्पाच्या कामाची गती अपेक्षेप्रमाणे नसताना, दुसरीकडे पूर्ण होणाऱ्या कामाच्या गुणवत्तेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे जायका प्रकल्पातील कामांची केवळ प्रगतीच नव्हे, तर प्रत्यक्ष दर्जाचीही स्वतंत्र तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT