ANTF Raided Kondhwa's News Sarkarnama
पुणे

Pune ANTF: पुण्यात पहाटे ANTF चा सर्जिकल स्ट्राईक; कोंढव्यात 2 गांजा विक्रेत्यांसह 43 जण ताब्यात

ANTF Raided Kondhwa's News: गुरुवारी पहाटेच्या सुमारास संपूर्ण परिसर गाढ झोपेत असताना, पथकाने परिसराला चारी बाजूंनी वेढा घातला. पोलिसांची चाहूल लागताच पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या ४३ नशेबाजांची आणि दोन विक्रेत्यांची पळता भुई थोडी झाली.

सरकारनामा ब्यूरो

Pune News: पुण्यातील गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांच्या तस्करीत मोठी कारवाई करण्यात आली. कोंढवा परिसरात आज गुरुवारी (ता. २०) पहाटेच्या एकच खळबळ उडाली. अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने (ANTF) टाकलेल्या छाप्यामुळे कोंढव्यातील ड्रग्ज नेटवर्कचे धाबे दणाणले.

शिवनेरी गल्लीतील काकडे वस्तीजवळील एका धार्मिक स्थळाजवळ ANTF च्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे थेट सर्जिकल स्ट्राईक करत, गांजाची विक्री करणाऱ्या दोन मुख्य म्होरक्यांसह तब्बल ४३ गर्दुल्ल्यांना जागेवरच बेड्या ठोकल्या.

तीन किलो गांजा अन् २५ हजारांची रोकड जप्त

या कारवाईदरम्यान मुख्य संशयित आरोपी गणेश सिद्धू पाटोळे याच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून, त्याच्या ताब्यातून तब्बल तीन किलो गांजा आणि सुमारे २६ हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झालेल्या माहितीनुसार, हा संपूर्ण काळा बाजार अज्जू भाई ऊर्फ अजु अहमद शेख याच्या इशाऱ्यावर सुरू होता. अज्जूच्या सांगण्यावरूनच गणेश पाटोळे या भागात गांजा विक्रीचे जाळे चालवत होता. विशेष म्हणजे, आरोपी पाटोळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीही एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी आता त्याच्यावर कडक कारवाईचा बडगा उगारला आहे.

पहाटेच्या अंधारात ANTF ची 'खास' फील्डिंग

कोंढव्यात रंगणाऱ्या या नशेच्या बाजाराची कुणकुण मिळताच ANTF च्या पथकाने अत्यंत गुप्ततेने या कारवाईचे नियोजन केले. गुरुवारी पहाटेच्या सुमारास संपूर्ण परिसर गाढ झोपेत असताना, पथकाने परिसराला चारी बाजूंनी वेढा घातला. पोलिसांची चाहूल लागताच पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या ४३ नशेबाजांची आणि दोन विक्रेत्यांची पळता भुई थोडी झाली. पोलिसांनी एकापाठोपाठ एक सर्वांना ताब्यात घेतले.

खाकीची धडक कारवाई; तस्करांचे धाबे दणाणले

महाराष्ट्र राज्याच्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने (पुणे) दाखवलेल्या या धैर्यामुळे पुणे शहरातील ड्रग्ज तस्करांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ही संपूर्ण धडक कारवाई ANTF च्या प्रमुख ज्योतिप्रिया सिंह, प्रवीण पाटील, अनुज तारे, पोलीस उपअधीक्षक नंदिनी वग्यानी, पोलीस उपअधीक्षक तावसकर, फौजदार सरवदे, एएसआय तुपे, हवालदार कळसकर, हवालदार ढेभे, पोलीस अंमलदार साबळे आणि पोलीस अंमलदार होळकर यांच्या विशेष पथकाने केली. कोंढवा आणि आसपासच्या परिसरात अंमली पदार्थांची खरेदी-विक्री करणाऱ्यांची आता खैर नाही, असाच थेट इशारा खाकीने या कारवाईतून दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT