vasant more sarkarnama
पुणे

Vasant More Resign Mns : "साहेब मला माफ करा", वसंत मोरेंचा मनसेला 'जय महाराष्ट्र'

Sudesh Mitkar

पुण्यात मनसेला मोठा धक्का बसला आहे. पुणे लोकसभा निवडणूक ( Pune Lok Sabha Election ) इच्छुक असलेले माजी शहराध्यक्ष, वसंत मोरे यांनी पक्षाला रामराम ( Vasant More Resign Mns ) ठोकला आहे. गेल्या काही दिवसांपासून वसंत मोरे मनसेत नाराजी असल्याची चर्चा होती. तसेच, पक्षाकडून सतत डावलण्यात येत असल्याची खंत वसंत मोरेंनी बोलून दाखवली होती. त्यातच वसंत मोरेंनी मनसेला 'जय महाराष्ट्र' केला आहे. मोरेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांच्याकडे पत्राद्वारे राजीनामा पाठवला आहे. त्यामुळे आगामी काळात वसंत मोरे कोणत्या पक्षात प्रवेश करतात, याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.

पक्षात स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून विरोध होत असल्याची खंत वसंत मोरे यांनी पत्रात व्यक्त केली आहे. वसंत मोरे ( Vasant More ) म्हणाले, "पक्षाच्या स्थापनेपासून (किंबहुना त्याही आधीपासून) पक्षाचा सदस्य आणि इतर पदांवर काम करत असताना आपण दिलेल्या जबाबदाऱ्या आणि आदेश यांचे पालन करण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करत आलो आहे. पक्ष संघटना वाढीसाठी गेली 18 वर्ष सातत्याने काम करत असताना पुणे शहरात आणि सरचिटणीस म्हणून महाराष्ट्रात कार्यरत राहिलो."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"...म्हणून राजीनामा देत आहे"

"परंतु, अलीकडच्या काळात पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या विरोधात होत असलेले पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण व पक्षाप्रति असलेल्या माझ्या निष्ठेवर उपस्थित होत असलेले प्रश्नचिन्ह माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी आहे. भविष्यात पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून यावेत यासाठी मी स्थानिक पदाधिकाऱ्यांना सामावून घेऊन मदत व उपक्रम देतो, त्यांना ताकद देतो, त्या सहकाऱ्यांची शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून 'कोंडी' करण्याचे 'तंत्र' अवलंबिले जात आहे. म्हणून मी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा देत आहे. कृपया आपण तो स्वीकारावा ही नम्र विनंती," असं वसंत मोरेंनी म्हटलं आहे.

राज ठाकरेंच्या फोटोसमोर नतमस्तक

तसेच, वसंत मोरे यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. त्यात वसंत मोरे राज ठाकरेंच्या फोटोसमोर नतमस्तक झालेले पाहायला मिळत आहेत. पोस्टवर लिहिलं की, "अखेरचा जय महाराष्ट्र, साहेब मला माफ करा."

"एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर..."

दरम्यान, सोमवारी ( 11 मार्च ) रात्री 11 वाजून 56 मिनिटांनी वसंत मोरेंनी फेसबुक पोस्ट केली. त्यात लिहिलेलं, "एका मर्यादेच्या बाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो... त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो, ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो." या पोस्टवर समर्थकांनी कमेंट करत निर्णय घेण्याची मागणी केली होती. अशातच मोरेंनी दुसऱ्याच दिवशी पक्षाला रामराम केला आहे.

( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT