Aaba Bagul  Sarkarnama
पुणे

Aaba Bagul News : काँग्रेसच्या निराधार 'आबा बागुलांना आता 'खुर्ची'चा आधार !

Chaitanya Machale

Pune News : पुण्यातील कसबा पेठ मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपला धडा शिकविल्यानंतर काँग्रेसच्या तिकिटावर दिल्लीला निघालेल्या रवींद्र धंगेकरांना स्वःपक्षातून 'ब्रेक' लावण्याचा प्रयत्न झाला. पुणे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस हायकमांडने धंगेकरांची उमेदवारी जाहीर करताना याच पक्षाचे नेते,माजी उपमहापौर आबा बागुलांनी धंगेकरांच्या उमेदवारीला विरोध, तेवढेच नव्हे तर, पक्ष कार्यालयात तेही भर उन्हात ठिय्या मांडून आबांनी हायकमांडलाच इशारा दिला.

पक्षाकडून दखल घेतली जात नसल्याचे लक्षात येताच आपला विरोधी पवित्रा कायम ठेवून आबा बागुल यांनी थेट भाजपचे नेते,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आणि भाजप प्रवेशाच्या चर्चेचा धुरळा उडवून दिला. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर आबांच्या खेळ्यांमुळे धंगेकरच नव्हे काँग्रेसला धक्का बसण्याची भीती होती. दरम्यान, आबांची मनधरणी करण्याच्या उद्देशाने काँग्रेसचे वरिष्ठ नेते, विधानसभेतील गटनेते बाळासाहेब थोरात त्यांच्या घरी गेले. त्यानंतर आबांनी पक्षाचे पुणे शहराध्यक्षपद हवे असल्याचे आग्रह धरल्याची चर्चा पसरली. आधी पुणे लोकसभेसाठी दावा ठोकणारे, त्यानंतर शहराध्यक्ष पद हवे असल्याचा आग्रह धरल्याची चर्चा पसरली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुणे (Pune) लोकसभेसाठी आधी दावा ठोकणारे, त्यानंतर धंगेकरांना विरोध करणारे, फडणवीसांना भेटून राजकीय वर्तुळात हवा करणाऱ्या आबांची आता थेट काँग्रेसच्या हायकमांडने दखल घेतली. त्यांनी आबांना पुणे शहर,पश्चिम महाराष्ट्र नव्हे तर चक्क प्रदेश पातळीवर उपाध्यक्ष केले. त्यामुळे शहराध्यक्षाच्या खुर्चीत बसू पाहणाऱ्या आबांना प्रदेश कार्यालयात आता मान राहणार आहे. परिणामी, राजकीय महत्त्वाकांक्षा तसूभरही कमी होवू न देणाऱ्या आबा बागुलांचा रुबाब वाढणार आहे. मात्र, हे पद मिळाल्यानंतर का होईना पण आबा धंगेकरांसाठी पर्वतीत फिरणार का? आणि किती मते खेचणार, याचा फैसला 4 जूनला होईलच. पण आबांना हे पद मिळाल्याने धंगेकरांनाही आधार मिळाल्याची चर्चा आहे.

उपाध्यक्षपदी निवडीच्या या पत्रामुळे आबांना आता राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) सभेतील व्यासपीठावर मानाने खुर्ची मिळणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथलाजी यांच्या मान्यतेनुसार आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार आबा बागुल यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे बागुल यांना दिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे. आबा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष झाल्याचा आनंद फडणवीस भेटीला गेलेल्या अमित आणि हेमंत बागुल यांनाही झाला आहे. आबांच्या निवडीचे पत्र सोशल मिडीयावर व्हायरल करून अमित आणि हेमंत बागुलांनी 'हम भी किस से कम नही', हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT