Murlidhar Mohol, Ravindra Dhangekar Sarkarnama
पुणे

Pune Loksabha Election 2024: पुण्यात मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र धंगेकर होणार लढत?

Murlidhar Mohol Vs Ravindra Dhangekar : भाजपला पराभूत करायचे झाल्यास त्याच ताकदीचा आणि जनसामान्यात मिसळणारा उठबस असणारा उमेदवार महाविकास आघाडीला द्यावा लागणार आहे.

Chaitanya Machale

Pune Political News : भाजपने आपल्या दुसऱ्या यादीत पुणे लोकसभेसाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची उमेदवारी जाहीर केली आहे. गेले दोन टर्म पुण्यामध्ये भाजपचा उमेदवार विजयी होत असून, मोहोळ यांच्या माध्यमातून विजयाची हॅटट्ट्रिक करण्याचा निर्धार भाजपने केला आहे. भाजपने मोहोळ यांना उमेदवारी जाहीर केल्याने आता त्यांच्या विरोधात काँग्रेस कोणाला रिंगणात उतरवणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी ओळख पुणे लोकसभा मतदारसंघाची होती. एक ते दोन अपवाद वगळता काँग्रेसच्याच उमेदवाराने या मतदारसंघातून लोकसभेसाठी प्रतिनिधित्व केले आहे. काँग्रेसचे सुरेश कलमाडी यांनी पुणे लोकसभेसाठी अनेक वर्षे पुण्यातून खासदार म्हणून प्रतिनिधित्व केले.

दहा वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे हे पुणे लोकसभेतून निवडून आले. त्यानंतर गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत गिरीश बापट यांना भाजपने उमेदवारी दिली, तर काँग्रेसकडून मोहन जोशी यांना उमेदवारी देण्यात आली होती. बापट यांनी मोठ्या मताधिक्याने जोशी यांचा पराभव केला.

'अबकी बार 400 पार' हा नारा देत भाजपने नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत अधिकाधिक जागा भाजपला कशा मिळतील, यासाठी गेल्या काही महिन्यांपासून सुरुवात झाली आहे. त्यानुसार उमेदवार दिले जात आहेत. भाजपला पराभूत करायचे झाल्यास त्याच ताकदीचा आणि जनसामान्यात मिसळणारा उठबस असणारा उमेदवार महाविकास आघाडीला द्यावा लागणार आहे.

महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये पुणे लोकसभेची (Pune Loksabha Election) जागा ही काँग्रेसकडे आहे. त्यामुळे या मतदारसंघातून काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार याकडे आता लक्ष लागले आहे.

माजी आमदार मोहन जोशी, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, कसब्याचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह अन्य काही जणांनी लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे सांगितले आहे. मात्र, यामध्ये जोशी आणि धंगेकर यांची नावे आघाडीवर आहेत. आमदार धंगेकर यांनी गेल्या काही दिवसांपासून लोकसभेच्या दृष्टीने आपला प्रचार सुरू केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपने लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांना उमेदवारी जाहीर केल्याने आता काँग्रेसकडून धंगेकर यांचे नाव पुढे येण्याची शक्यता आहे. कसबा विधानसभेच्या भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत धंगेकर हे काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले होते. भाजपचे उमेदवार स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांचा धंगेकर यांनी पराभव केला होता. भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या कसब्यात धंगेकर यांचा विजय काँग्रेसला प्रोत्साहन देणारा ठरला आहे.

'हक्काचा माणूस ' अशी ओळख आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांची असून, त्यांनी गेल्या काही महिन्यांतच लोकांमध्ये जाऊन आपली वेगळी ओळखदेखील निर्माण केली आहे. महागाई, शहरात वाढलेली वाढती गुन्हेगारी, ड्रग्ज अशा विविध प्रश्नांवर धंगेकर यांनी आवाज उठविला आहे. तसेच कसबा भागातील विविध विकासकामे यानिमित्ताने ते नागरिकांशी जोडलेले असतात. त्यामुळे काँग्रेसने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यास मोहोळ विरुद्ध धंगेकर अशी लढत पाहायला मिळणार आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT