भाजपला प्रत्येक कार्यक्रमाचा जोरदार इव्हेंट करण्याची सवय आहे. कार्यक्रम छोटा असो वा मोठा, त्याचे भव्य आयोजन आणि वातावरणनिर्मिती करण्यावर भाजपचा नेहमीच भर असतो. त्यामुळेच भाजप हा इव्हेंटबाजी करणारा पक्ष आहे, अशी टीकाही वारंवार केली जाते.
मात्र, नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रो मार्गाचे लोकार्पण झाले, खडकवासला ते खराडी, रामवाडी ते विठ्ठलवाडी, नळ स्टाॅप ते माणिकबाग या मेट्रो मार्गाचे भूमिपूजन झाले. जवळपास २२००० कोटी रुपयांची ही कामे आहेत. पण किरकोळ कामाचा इव्हेंट करणारे भजापवाल्यांनी हजारो कोटींच्या कामाचा गाजावाजा केला नाही. वातावरणनिर्मिती केल्याचे दिसले नाही. त्यामुळे भाजपने यावेळी इव्हेंटबाजीकडे दुर्लक्ष का केले असावे, असा प्रश्न पडला.
२०२२ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यातील पहिल्या मेट्रोचे उद्घाटन झाले होते. वनाज ते रामवाडी या मार्गावरील वनाज ते गरवारे महाविद्यालय हा पहिला टप्पा त्यावेळी सुरू झाला होता. त्या उद्घाटनाच्या वेळी भाजपने शहरात मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन केले होते. पुण्यात पहिली मेट्रो सुरू होत असल्याने नागरिकांमध्येही मोठा उत्साह आणि उत्सुकता होती. मेट्रोचे काम अपूर्ण असल्याने त्यावर टीकाही होत होती. मात्र, या प्रकल्पाची चर्चा शहरभर होती.
याउलट, शिवाजीनगर ते हिंजवडी हा २३ किलोमीटरचा महत्त्वाचा मेट्रो मार्ग सुरू होत असताना भाजपकडून तशा प्रकारची वातावरणनिर्मिती झालेली दिसली नाही. नागरिकांमध्ये या मार्गाची चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्नही फारसा झालेला दिसला नाही. असे का?
वास्तविक, हिंजवडीतील वाहतूक कोंडी आणि रस्त्यांच्या समस्यांवर हा मेट्रो मार्ग महत्त्वाचा पर्याय ठरणार आहे. शिवाजीनगर, बाणेर आणि बालेवाडी परिसरातील नागरिकांना थेट मेट्रोने आयटी कंपन्यांपर्यंत पोहोचता येणार आहे. तसेच जिल्हा न्यायालय स्थानकावरून मेट्रो बदलून खराडीपर्यंतही प्रवास करता येणार आहे. म्हणजेच हिंजवडी आणि खराडी या पुण्यातील दोन महत्त्वाच्या आयटी पार्कना मेट्रोच्या माध्यमातून जोडण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा आहे.
असे असतानाही भाजपने या लोकार्पणाचा मोठा इव्हेंट का केला नाही? इव्हेंटबाजी करून पक्षाचे मन भरले आहे की, बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार भाजपने स्वतःमध्ये काही बदल केले आहेत? हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो.
खरंतर, नागरिकांची अपेक्षा हीच आहे की, प्रत्येक कामाचा गाजावाजा करण्यापेक्षा प्रत्यक्ष विकासकामांना प्राधान्य दिले जावे. घोषणाबाजी आणि शक्तिप्रदर्शनापेक्षा कामातून विकास दिसावा. भाजपकडून इतकी वर्षे सातत्याने इव्हेंटबाजी केली जात असताना यावेळी मात्र वेगळे चित्र दिसले. देशातील आणि राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीचा हा परिणाम आहे का? भाजपने स्वतःची कार्यशैली बदलण्यास सुरुवात केली आहे का? की यामागे आणखी काही राजकीय गणित आहे?
या प्रश्नाचे उत्तर भाजप नेते, कार्यकर्त्यांकडे आहे का ?
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.