Pune MLC Election | Mahayuti Sarkarnama
पुणे

Pune MLC Election : भाजपनी वाढवली होती राष्ट्रवादीची धाकधूक, शेवटच्या क्षणी सुत्रं फिरली अन् कंद यांची माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?

Pune Legislative Council Election Update : एकीकडे पक्षांतर्गत नाराजी दूर करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस यशस्वी ठरला असताना दुसरीकडे भाजपच्या प्रदीप कंद यांनी दाखल केलेला अर्ज मागे घेण्यासाठी अखेरचे काही मिनिटं बाकी असताना देखील ते जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले नव्हते.

Sudesh Mitkar

Pune News, 04 Jun : विधानपरिषदेच्या निवडणुकांसाठी अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत हे अर्ज माघारी घेता येणार आहेत. त्यामुळे महायुतीकडून महाराष्ट्रातील 17 जागांवर बिनविरोध निवडणूक व्हावी तसेच इतर मित्र पक्षांच्या नेत्यांकडून दाखल करण्यात आलेल्या अर्ज माघारी घेण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत.

बहुतांश ठिकाणी याबाबत यश मिळाले असले तरी अद्यापही काही ठिकाण मित्र पक्षातील नेत्यांनी अद्याप अर्ज माघारी घेतले नसल्याचे पाहायला मिळत आहे. महायुतीमध्ये पुण्याची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली आहे. भाजपने या जागेवर दावा सांगितला होता. मात्र वरिष्ठ पातळीवर झालेल्या चर्चेनंतर ही जागा अखेर राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात आली.

या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेसने विक्रम काकडे यांना उमेदवारी दिली आहे. विक्रम काकडे यांच्या सोबतच सुनील टिंगरे यांनी देखील या ठिकाणी पक्षा कडून अधिकृत असा अर्ज दाखल केला होता. मात्र भविष्यात तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही, पक्ष तुमचा नक्की विचार करेल असं आश्वासन दिल्यानंतर सुनील टिंगरे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

एकीकडे पक्षांतर्गत नाराजी दूर करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस यशस्वी ठरला असताना दुसरीकडे भाजपच्या प्रदीप कंद यांनी दाखल केलेला अर्ज मागे घेण्यासाठी अखेरचे काही मिनिटं बाकी असताना देखील ते जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले नव्हते. त्यामुळे ऐनवेळी काही गडबड तर नाही होणार नाही ना अशी धाकधूक राष्ट्रवादीमध्ये निर्माण झाली होती.

दरम्यान, प्रदीप कंद यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर कंद यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचे सांगितले जात होत. त्यानंतर प्रदीप कंद हे उमेदवारी अर्ज मागे घेतील असं देखील बोल जात होतं. मात्र अर्ज माघारी घेण्याच्या आदल्या दिवशी सायंकाळी प्रदीप कंद हे नॉट रीचेबल झाल्याच्या देखील चर्चा होत्या. त्यांचे दोन्हीही संपर्क क्रमांक हे नॉट रीचेबल लागत होते. त्यामुळे अनेक तर्क वितर्क लढवले जात होते.

महायुतीचे उमेदवार असलेल्या काकडे यांनी देखील इतर नाराज नेत्यांची भेट घेतली होती मात्र त्यांनी प्रदीप कंद यांना भेटणं टाळलं होतं. त्यामुळे प्रदीप कंद हे वेगळा निर्णय घेणार का? अशा चर्चा सुरू असतानाच भाजप आमदार राहुल कुल यांच्या सोबत अखेरची काही मिनिट बाकी असताना प्रदीप कंद हे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

तर अर्ज माघारी घेतल्यानंतर प्रदीप कंद यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल कुल यांनी सांगितलं की महायुतीचा धर्म पाळला पाहिजे. आम्ही आमच्या नेत्यांचे ऐकले आहे आणि अर्ज मागे घेतला आहे. सुनेत्रा पवार यांचा सुद्धा मला फोन आला होता. महायुतीच्या नेत्यांचा आदेश पाळून निर्णय झाला आहे आणि अर्ज मागे घेतला आहे. सर्व लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांकडे भाजपला ही जागा मिळावी यासाठी आग्रह केला होता पण जागा राष्ट्रवादीला सुटली. एकदा नेत्यांनी आदेश दिला की माझ्या अपेक्षा यांना काही अर्थ राहत नाही."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT