

Nanded MLC Election 2026 : भाजपचे खासदार अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नांदेड जिल्ह्यातील नेते आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेत महायुतीचा धर्म पाळणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र महायुतीतील तिसरा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचा एकही प्रतिनिधी या पत्रकार परिषदेला हजर नव्हता. मात्र चिखलीकर-चव्हाण या दोघांनी ते आमच्यासोबतच असल्याचा दावा केला. दरम्यान शिवसेनेला निमंत्रण दिले नाही, ही माझी चूक झाली, अशी कबुली प्रताप पाटील चिखलीकरांनी दिली.
नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून आज माघारीच्या शेवटच्या दिवशी प्रताप पाटील चिखलीकर यांचे चिरंजीव प्रवीण पाटील यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता महायुतीचे अमर राजूकर विरुद्ध काँग्रेसचे रामदास सुमठाणकर यांच्यात थेट लढत होणार हे स्पष्ट झाले. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असे आमचे प्रयत्न असल्याचे चव्हाण-चिखलीकर यांनी सांगीतले. शिवसेनेचा जिल्ह्यातील एकही नेता चिखलीकर-चव्हाण यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत उपस्थित नसल्याने मात्र उलट सुलट चर्चा सुरूच आहेत.
प्रताप पाटील चिखलीकर यांनी प्रवीण चिखलीकर यांच्या उमेदवारी दाखल करण्याबद्दलचे कारण स्पष्ट केले. माझ्या मुलाने अर्ज भरला, आमच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा सुटली पाहिजे, अशी आम्ही मागणी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे यांच्या बैठकीनंतर नांदेडची जागा भाजपाला सुटली. त्यामुळे पक्षाचे आदशे आणि महायुतीचा धर्म म्हणून प्रवीण पाटील चिखलीकर यांचा अर्ज मागे घेत असल्याचे त्यांनी जाहीर केले.
भाजपाचे संख्याबळ अधिक असले तरी कुठे तरी आमचेही संख्याबळ आहे. माझी आणि अशोक चव्हाण साहेबांची फोनवर चर्चा झाली. अमरनाथ राजूकर यांच्याशीही बोलून एकत्र पत्रकार परिषदे घेण्याचे ठरवले. शिवसेनेला निमंत्रण देण्याचे माझ्याकडून राहून गेले. राष्ट्रवादीची सर्व मते आम्ही अमरनाथ राजूकर यांच्या पाठिशी उभी करू.
कुठल्याही अटी शर्तीशिवाय प्रवीण पाटील चिखलीकर यांची माघार घेण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नेत्यांच्या आदेशनूसार महायुतीचा धर्म पाळणार असून एकत्र लढण्याचा निर्णय नेत्यांनी घेतला आहे. शिवसेनेचे इथे कोणी आले नसले तरी ते आमच्या सोबत आहेत. माझी चूक झाली, मी त्यांना बोलावले नाही, अशी कबुलीही चिखलीकर यांनी दिली. त्यानंतर अशोक चव्हाण यांनीही त्यांचीच री ओढली.
जुनं का उगाळता?
अशोक चव्हाण- प्रताप पाटील चिखलीकर एकत्र आल्यानंतर माध्यमांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. यापुर्वी नगरपालिका, नगरपंचायत, महापालिका निवडणुकीत तुम्ही एकमेकांवर विखारी टिका केली याची आठवण पत्रकारांनी त्यांना करून दिली. यावर अशोक चव्हाण यांनी जुनं कशाला उगाळता? म्हणत त्रागा केला. तर राजकारणात सगळं चालतं म्हणत चिखलीकरांनीही यावर अधिक बोलणे टाळले.
विधान परिषदेच्या सर्व जागा महायुतीने जिंकल्या पाहिजेत ही आमच्या तीनही पक्षांच्या नेत्यांची भूमिका आहे. प्रवीण चिखलीकर, व इतरांनी अर्ज दाखल केले तेव्हा जागा कोणाला सुटते? हे स्पष्ट नव्हते. म्हणून हे अर्ज दाखल केले गेले होते, अशी सारवा सारव अशोक चव्हाण यांनी केली. आम्ही एकत्र काँग्रेसमध्ये, भाजपामध्ये असतानाही एकत्र काम केले आहे. त्यामुळे आम्ही एकमेकांना चांगले ओळखतो, असा चिमटाही अशोक चव्हाण यांनी यावेळी काढला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.