Pune Lok Sabha Election : लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करण्याच्या सूचना महाराष्ट्र सैनिकांना दिल्या आहेत. त्यामुळे आता मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी प्रचारात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे शहर लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर महायुतीकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मोहोळ यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार मोहोळ यांच्या प्रचारामध्ये सक्रिय होण्याच्या सूचना मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी दिल्या आहेत. मागील आठवड्यात शहरातील प्रमुख पदाधिकारी तसेच मनसेच्या इतर शाखांचे प्रमुख पदाधिकारी यांची बैठक घेत ठाकरे यांनी या सूचना केल्या होत्या.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महायुतीच्या प्रचारामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) कामदेखील अत्यंत महत्त्वाचे ठरते. निवडणुकीच्या काळात तसेच प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवकांच्या माध्यमातून केले जाणारे काम फायदेशीर ठरत असल्याचे यापूर्वीच्या निवडणुकांमधून दिसून आले आहे. पुणे शहरातदेखील भारतीय जनता पक्ष, (BJP) अजित पवार यांची राष्ट्र्वादी काँग्रेस तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून लोकसभा निवडणुकीचे काम केले जात आहे, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 30 हजाराहून अधिक स्वयंसेवक पुणे शहरात आहेत. हे स्वयंसेवक आपल्या पद्धतीने निवडणुकीच्या काळात काम करत असतात.
लोकसभा निवडणुकीसाठी मनसेने महायुतील पाठिंबा जाहीर केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) निवडणुकीत भाजपचे काम करते. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शहरातील पदाधिकाऱ्यांनी आरएसएसचे काम कसे चालते ,यासाठी संघाचे मुख्य कार्यालय असलेल्या मोतीबागेला भेट दिली. तेथे जाऊन संघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट घेत त्यांच्याकडून मार्गदर्शनदेखील घेतले. मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे, साईनाथ बाबर, शहरातील मनसेचे नेते बाबू बागस्कर, गणेश सातपुते, बाळा शेडगे, रणजित शिरोळे यांच्यासह विभाग अध्यक्ष उपस्थित होते.
या भेटीबाबत अधिक माहिती देताना बाबू बागस्कर म्हणाले, या भेटीदरम्यान संघाचे देश पातळीवरील संघटन कसे चालते, दैनंदिन शाखा, संघाचे प्रचारक यांचे कामकाज, उन्हाळी शिबिरे याबाबतची माहिती जाणून घेतली. संघाचे पुणे (PUNE) शहर कार्यवाह यांच्यासह इतर संघ परिवातील प्रमुख पदाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात आली. संघ परिवारातील अन्य संघटनांचे काम, त्यांचे विविध प्रकल्प आणि त्यामागची भूमिकादेखील समजून घेण्यात आली. लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विशेष आग्रही असतो. मतदानाच्या दिवशी अधिकाधिक नागरिकांनी घराबाहेर पडून मतदान करावे, यासाठी संघ काम करत असल्याचे या भेटीदरम्यान लक्षात आल्याचे वागस्कर म्हणाले.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.