Pune Flex News: शहरातील अतिक्रमणांवर बुलडोझर फिरवल्यानंतर पुणे महापालिका प्रशासनाने आता थेट बेकायदा फ्लेक्सबाजी करणाऱ्यांविरोधात दंड थोपटला आहे. वाढदिवस, शुभेच्छा आणि राजकीय प्रसिद्धीच्या नावाखाली चौकाचौकांत लागणारे बेकायदा फ्लेक्स आणि त्यावर झळकणारे चेहरे आता महापालिकेच्या रडारवर आले आहेत.
विशेष म्हणजे, कोणाचे किती बेकायदा फ्लेक्स शहरात लागले आहेत, याची आकडेवारीच आता महापालिकेच्या वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे राजकीय फ्लेक्सबाजी करणाऱ्यांची चांगलीच पंचाई होण्याची चिन्हे आहेत.
रस्ते, पदपथ, चौक, दुभाजक, विजेचे खांब, झाडे आणि सार्वजनिक मालमत्तांवर परवानगीशिवाय बॅनर्स, फ्लेक्स, पोस्टर्स, कमानी व कटआऊट्स लावण्यास मनाई करण्यात आली आहे. महापालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागात अवघे १९ लिपिक आणि १५० बिगारी कार्यरत असून, शहरातील हजारो बेकायदा फ्लेक्सवर प्रत्येक वेळी कारवाई करणे मनुष्यबळामुळे शक्य होत नाही. यावर तोडगा म्हणून महापालिकेने ‘bhauflekadha.pmc.gov.in या संकेतस्थळावरून 'भाऊ, फ्लेक्स काढा!' ही मोहीम हाती घेतली आहे.
त्यामुळे नागरिकांना अनधिकृत फ्लेक्सचे फोटो आणि ठिकाणाची माहिती थेट संकेतस्थळावर अपलोड करता येणार आहे. एका ठिकाणचा एकच फोटो स्वीकारला जाणार असून, चेहऱ्यांच्या आधारे कोणाचे किती फ्लेक्स शहरात लागले आहेत याची संख्यात्मक यादी प्रसिद्ध केली जाईल. या यंत्रणेची चाचणी सध्या सुरू असून लवकरच ती कार्यान्वित होणार असल्याची माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजित नायर यांनी दिली आहे.
आकाशचिन्ह व परवाना विभागाने सोमवारी जाहीर सूचना प्रसिद्ध करत स्पष्ट केले आहे की, अनधिकृत फ्लेक्स आढळल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता ते काढले जातील आणि त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल केला जाईल.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचा आधार घेत तयार करण्यात आलेल्या या तरतुदीनुसार, फ्लेक्स उभारणारी व्यक्ती, त्यावर नाव किंवा छायाचित्र असलेली व्यक्ती, संबंधित मुद्रक, जाहिरात संस्था आणि कार्यक्रम आयोजक अशा सर्वांवरच गुन्हा दाखल होऊ शकतो.
महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध अधिनियम, १९९५ नुसार ३ महिन्यांपर्यंत कारावास किंवा २ हजार रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. फ्लेक्सवरील छायाचित्र संबंधित व्यक्तीच्या संमतीनेच लावल्याचे चौकशीसाठी गृहीत धरले जाईल. मात्र, विनासंमती फोटो लावला असल्यास संबंधित व्यक्तीला क्षेत्रीय कार्यालयात लेखी अस्वीकृती देऊन पोलिसांत तक्रार करता येईल. तसेच, छापील फ्लेक्सवर मुद्रकाचे नाव आणि पत्ता असणे बंधनकारक राहील.
शहरातील बेकायदा फ्लेक्स रोखण्यासाठी नागरिकांचाही सहभाग महत्त्वाचा आहे. 'भाऊ, फ्लेक्स काढा' या संकल्पनेतून कोणाचे किती फ्लेक्स लागले आहेत, हे सार्वजनिक होईल. कारवाईपेक्षाही फ्लेक्स लावणाऱ्यांना त्याची जाणीव व्हावी आणि त्यांनी स्वतःहून फ्लेक्स काढावेत, हा यामागील उद्देश आहे.अस अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.