

ZP Teachers Pay Scale: जिल्हा परिषद शाळांमधील सहावी ते आठवीच्या वर्गांना शिकविणाऱ्या विषय शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पदवीधर वेतनश्रेणीचा लाभ केवळ काही मोजक्या शिक्षकांपुरता मर्यादित ठेवण्याचा राज्य सरकारचा निर्णय आता टिकणार नाही.
समान शैक्षणिक पात्रता आणि समान स्वरूपाचे काम करणाऱ्या सर्व पात्र शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या विशेष अनुमती याचिका फेटाळून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे हजारो शिक्षकांना मोठा आर्थिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
या निकालामुळे पदवीधर वेतनश्रेणीच्या लाभापासून वंचित राहिलेल्या पात्र शिक्षकांना दिलासा मिळणार आहे. आतापर्यंत केवळ एकतृतीयांश शिक्षकांनाच मिळणारा लाभ आता सर्व पात्र शिक्षकांना देण्याची जबाबदारी राज्य सरकारवर आली आहे. वेतनश्रेणीसह थकबाकी मिळण्याचाही मार्ग मोकळा झाला आहे.
सर्वोच्च न्यायालयात न्या. ऑगस्टीन जॉर्ज मसीह आणि न्या. सुनीता अग्रवाल यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात हस्तक्षेप करण्याचे कोणतेही कारण नसल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने राज्य सरकारच्या याचिका फेटाळल्या. परिणामी, पदवीधर वेतनश्रेणीच्या लाभाबाबत उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश कायम राहिले आहेत.
राज्य सरकारने २०१६ मध्ये काढलेल्या शासन निर्णयातील एका तरतुदीवरून हा वाद निर्माण झाला होता. या निर्णयानुसार जिल्हा परिषद शाळांमधील सहावी ते आठवीच्या वर्गांना शिकविणाऱ्या केवळ एकतृतीयांश विषय शिक्षकांनाच पदवीधर वेतनश्रेणीचा लाभ दिला जात होता. मात्र, समान शैक्षणिक पात्रता असूनही एकसारखे काम करणाऱ्या शिक्षकांमध्ये अशा प्रकारे भेदभाव का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यांतील शिक्षकांनी या तरतुदीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले होते. या याचिकांवर सुनावणी करताना न्या. मुकुलिका जवळकर आणि न्या. नंदेश देशपांडे यांच्या खंडपीठाने एकतृतीयांश शिक्षकांपुरती असलेली मर्यादा रद्द केली. तसेच समान पात्रता आणि समान काम करणाऱ्या सर्व पात्र विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी देण्याचे आदेश दिले.
उच्च न्यायालयाने संबंधित शिक्षकांना नियुक्तीच्या तारखेपासून किंवा आवश्यक शैक्षणिक पात्रता प्राप्त केल्याच्या तारखेपासून पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार वेतनातील फरकाची थकबाकी आठ आठवड्यांच्या आत अदा करण्याचेही आदेश देण्यात आले होते.
उच्च न्यायालयाच्या ८ मे २०२६ रोजीच्या निकालाविरोधात राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल केल्या होत्या. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्या फेटाळल्याने शिक्षकांच्या बाजूने दिलेला उच्च न्यायालयाचा निर्णय कायम झाला आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. प्रदीप क्षीरसागर यांनी बाजू मांडली. समान कामासाठी समान वेतन या तत्त्वाला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे बळ मिळाले आहे. त्यामुळे राज्य सरकार आता या निकालाची अंमलबजावणी कशी आणि किती लवकर करते, याकडे जिल्हा परिषद शिक्षकांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.