PMC  Sarkarnama
पुणे

PMC: पुण्यात भाजप नगरसेवकांमध्ये 'सीट पॉलिटिक्स' : निम्हण, पठारे, दोडकेंची जागा गेली, टिंगरे, दगडे थेट पहिल्या रांगेत

Pune Municipal Corporation, BJP Corporators, Seating Row Dispute: पुणे महापालिकेच्या मुख्य सभागृहात भाजप नगरसेवकांच्या बसण्याच्या जागांवरून वाद निर्माण झाला. ज्येष्ठतेनुसार जागांमध्ये बदल करण्यात आला असून, अंतर्गत नाराजी उघड झाली.

Sudesh Mitkar

Pune Municipal Corporation: पुणे महानगरपालिकेच्या मुख्य सभागृहात सत्ताधारी भाजपमध्ये सध्या एका वेगळ्याच विषयावरून अंतर्गत मानापमान नाट्य रंगल्याचे पाहायला मिळत आहे. महापालिकेतील सत्ता टिकवणे आणि कारभार चालवणे एकीकडे, तर सभागृहात 'कुणी कुठं बसायचं?' यावरून झालेला वाद आता वरिष्ठ नेत्यांच्या दरबारात पोहोचला आहे.

अखेर या नाराजीनाट्यानंतर प्रशासनाला मुख्य सभेच्या बैठकीच्या व्यवस्थेत ऐनवेळी बदल करावा लागला असून, काही नगरसेवकांना पुढच्या बाकावरून शेजारच्या किंवा थेट मागच्या बाकावर जावे लागले आहे.

नेमका वाद काय आहे ?

पुणे महापालिकेत सर्वाधिक १२६ नगरसेवक असलेला भाजप सत्ताधारी पक्ष आहे. त्यामुळे मुख्य सभागृहाचा जवळपास एक-तृतियांश भाग भाजपच्या नगरसेवकांनीच व्यापलेला असतो. पहिल्या रांगेतील २६ जागांपैकी तब्बल १९ जागा एकट्या भाजपच्या वाट्याला आल्या आहेत. महापालिका निवडणुकीनंतर जेव्हा मुख्य सभा अस्तित्वात आली, तेव्हा पक्षीय पार्श्वभूमी आणि ज्येष्ठतेनुसार जागा निश्चित करण्यात आल्या होत्या.

मात्र, पहिल्या टर्मच्या काही नगरसेवकांना आणि इतर पक्षांतून भाजपात प्रवेश केलेल्या नगरसेवकांना पहिल्या रांगेत स्थान देण्यात आले होते. यावरून पक्षातील मूळ आणि ज्येष्ठ नगरसेवकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला. आम्ही एवढी वर्षे पक्षात काम करतोय आणि आम्हाला मागच्या बाकावर बसवले जाते? अशी उघड नाराजी व्यक्त करत या ज्येष्ठ नगरसेवकांनी थेट पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रारींचा पाढा वाचला.

ज्येष्ठ नगरसेवकांच्या या आक्रमक भूमिकेनंतर पक्षाला आणि प्रशासनाला अखेर या बैठकीच्या व्यवस्थेत फेरबदल करणे भाग पडले. नव्या व्यवस्थेनुसार पहिल्या रांगेत बसणारे सनी निम्हण, बाळा ओसवाल आणि सचिन दोडके यांना आता मागच्या बाकावर जावे लागले आहे. सुरेंद्र पठारे यांची शेजारच्या बाकावर व्यवस्था केली आहे. तर ज्येष्ठतेचा न्याय लावत अनिल टिंगरे, किरण दगडे, श्रीकांत जगताप आणि प्रसन्न जगताप यांना आता पहिल्या रांगेत बसण्याची संधी देण्यात आली आहे. सोमवारी झालेल्या मुख्य सभेत हा बदल स्पष्टपणे दिसून आला.

राजकारणात 'पहिल्या रांगेतील स्थान' हे केवळ बसण्याची जागा नसून ते पक्षातील वजनाचे आणि प्रतिष्ठेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळेच महापालिकेच्या सभागृहात पुढच्या बाकावर बसण्यावरून झालेली ही रस्सीखेच पहिला मिळाली. मात्र हीच रस्सीखेच प्रभागातील विकास करण्यासाठी पहिल्या नंबर वरती राहण्यात दिसणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT