PMC  Sarkarnama
पुणे

PMC News : पुण्यात ‘वशिल्याचा झाडू’! नगरसेवकांची 30-40 जणांची यादी, ठेकेदार चिंतेत!

Contractors Corporators : पुणे महापालिकेच्या झाडणकामाच्या नव्या व्यवस्थेची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली आहे. मात्र,आपली माणसं कामाला घ्यावीत म्हणून नगरसेवकांनी दबाव आणल्याची चर्चा आहे.

Sudesh Mitkar

Pune News : पुणे महापालिकेच्या रस्ते झाडणकामाच्या नव्या व्यवस्थेची अंमलबजावणी आजपासून सुरू होत आहे. मात्र, या नव्या व्यवस्थेत आपल्या मर्जीतील माणसांना घुसडण्यासाठी काही नगरसेवकांनी ठेकेदारांवर जोरदार दबाव आणण्यास सुरुवात केली आहे.

दुसरीकडे, "नगरसेवकांची माणसे प्रत्यक्ष काम करत नाहीत" असा अनुभव असल्याने ठेकेदारांनी मात्र नगरसेवकांच्या या 'वशिला' संस्कृतीला थेट नकारघंटा दाखवली आहे.

ठेकेदारांनी केवळ कागदोपत्री काम दाखवून प्रत्यक्ष रस्त्यावर झाडणकाम न केल्याच्या तक्रारी महापालिकेकडे सतत येत होत्या. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने झाडणकामाच्या पद्धतीत महत्त्वाचा बदल केला आहे.

नव्या नियमानुसार, आता केवळ कामगार पुरवण्याची जबाबदारी ठेकेदारांची राहणार नसून, नेमून दिलेला परिसर, रस्ते, चौक आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याची थेट जबाबदारी त्यांचीच असेल. कामात त्रुटी आढळल्यास संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद प्रशासनाने केली आहे.

या नव्या धोरणासाठी महापालिकेने झाडणकामाचे मनुष्यबळ जवळपास दुप्पट केले आहे. यापूर्वी शहरात ४ हजार ८१६ कर्मचारी या कामासाठी कार्यरत होते, त्यात आता आणखी ४ हजार ७०९ कर्मचाऱ्यांची भर पडली आहे. त्यामुळे एकूण ९ हजार ५२३ कर्मचारी शहरातील रस्त्यांवर झाडणकाम करणार असून, यामुळे शहरातील स्वच्छतेत मोठी सुधारणा होईल, असा दावा प्रशासनाने केला आहे.

नगरसेवकांचा दबाव अन् ...

झाडणकामासाठी मोठी भरती होत असल्याचे पाहून सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्षाच्या काही नगरसेवकांनी थेट ठेकेदारांकडे तगादा लावला आहे. काही नगरसेवकांनी ३० ते ४० लोकांची भलीमोठी यादीच ठेकेदारांच्या हातात सोपवली आहे, तर काहींनी आपल्या वैयक्तिक कामांसाठी दोन-तीन कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

ठेकेदारांची भूमिका

वशिल्याने भरती झालेले कर्मचारी काम करत नाहीत आणि आता स्वच्छतेची थेट जबाबदारी तसेच दंडात्मक कारवाईची टांगती तलवार ठेकेदारांवरच आहे. त्यामुळे "नगरसेवकांची माणसे नको रे बाबा!" अशी ठाम भूमिका घेत ठेकेदारांनी नगरसेवकांच्या या दबावाला स्पष्ट विरोध दर्शवला आहे.

महापौरांनी घेतली बैठक

या नव्या धोरणाबाबत नगरसेवकांनी दर्शवलेला विरोध आणि निर्माण झालेल्या अडचणी सोडवण्यासाठी महापौर मंजूषा नागपुरे यांनी तातडीची बैठक घेतली. या बैठकीला सभागृहनेते गणेश बीडकर, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांच्यासह नगरसेवक आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. नवी झाडणकाम व्यवस्था लागू करताना नगरसेवकांच्या तक्रारी व अडचणी सोडवण्यासाठी प्रशासन पूर्ण सहकार्य करेल, असे आश्वासन या बैठकीत देण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT