Satyajeet Tambe  Sarkarnama
पुणे

PMC: पुणे महापालिकेचे बनावट लेटरहेड, IT चे बोगस सर्टिफिकेट; पुण्यात बेरोजगार तरुणांची लाखोंची फसवणूक, गृहविभागाची 'सुमोटो' चौकशी

Pune Job Scam, Fake Experience Certificates, Recruitment Fraud: पुण्यात बनावट अनुभव प्रमाणपत्रे, पीएमसी नियुक्तीपत्रे आणि भरती फसवणुकीच्या रॅकेटची विधान परिषदेत चर्चा झाली. सरकारने मुख्य संशयिताविरोधात 'सुओ मोटो' चौकशी करून कठोर कारवाईचे आश्वासन दिले.

Sudesh Mitkar

Pune Job Scam: पेपरफुटी आणि सरकारी भरतीतील घोटाळ्यांनंतर आता बेरोजगार तरुणांना लुटणाऱ्या संघटित टोळ्यांचा सुळसुळाट झाला आहे. हा मुद्दा पावसाळी अधिवेशनात गाजल्याचं पहायला मिळालं. आयटी कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या बनावट अनुभव पत्राचं रॅकेट आणि पुणे महापालिकेच्या नावाने बनावट लेटरहेड व नियुक्तीपत्रे देऊन तरुणांची फसवणूक केल्याचा मुद्दा आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केला. यावर शासन या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मुख्य संशयिताची 'सुमोटो' चौकशी करेल आणि दोषींवर कडक कारवाई करेल, असे आश्वासन गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहात दिले.

लक्षवेधी मांडताना आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले, पुणे हे आयटी क्षेत्राचं मोठं केंद्र असल्याने राज्यभरातून हजारो तरुण येथे नोकरीच्या आशेने येतात, पण त्यांच्या असहायतेचा आणि अनुभवाच्या अभावाचा गैरफायदा काही टोळ्या घेत आहेत. आयटी कंपन्यांच्या नावाने बनावट अनुभव प्रमाणपत्रे, पगाराच्या स्लिप, पीएफ, फॉर्म-१६, आयकर रिटर्न आणि बँक स्टेटमेंट यांसारखी बोगस कागदपत्रे तयार करून तरुणांकडून लाखो रुपये उकळले जात आहेत.

इतकेच नव्हे तर पुणे महापालिकेच्या नावाने थेट बनावट लेटरहेड आणि नियुक्तीपत्रे दिली जात असून बँक व्हेरिफिकेशनच्या वेळी फसवणूक करणारे गायब होतात आणि निरपराध तरुण यात अडकतात, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

या पार्श्वभूमीवर तांबे यांनी सरकारला काही सवाल केले. बनावट अनुभव प्रमाणपत्रे आणि कागदपत्रांच्या रॅकेटवर कारवाईसाठी गृह विभाग स्वतंत्र मोहीम राबवणार का? पुणे महापालिकेच्या बनावट लेटरहेड प्रकरणातील मुख्य आरोपींना अद्याप अटक का झाली नाही? भीतीपोटी तक्रार न करणाऱ्या तरुणांसाठी पोलिसांची स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करणार का? आणि पुणे शहरात अशा प्रकारचे किती गुन्हे दाखल आहेत? याची माहिती एका महिन्यात सभागृहाच्या पटलावर ठेवणार का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

खडक आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हे

सत्यजित तांबे यांच्या प्रश्नांना उत्तर देताना मंत्री योगेश कदम यांनी सांगितले, या संदर्भात ३० जानेवारी रोजी पुणे पोलीस आयुक्तांकडे पहिली सामान्य तक्रार आली होती आणि त्यानंतर १२ जून रोजी पुणे महापालिकेच्या उपायुक्तांकडे तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणाचा पाठपुरावा करत असतानाच १० फेब्रुवारी रोजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात तक्रारदाराच्या नातेवाईकांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. तसेच खडक पोलीस स्टेशनमध्ये अमीर शेख नावाच्या व्यक्तीविरुद्ध सुमारे २ लाख ८६ हजार रुपयांच्या फसवणुकीची चौथी तक्रार आल्यानंतर रीतसर FIR नोंदवण्यात आली आहे, अशी माहिती कदम यांनी दिली.

सरकार करणार 'सुमोटो' चौकशी

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, कारवाईच्या भीतीने काही संशयितांनी घेतलेली रक्कम परत केल्यामुळे तक्रारदारांनी आपल्या तक्रारी लेखी स्वरूपात मागे घेतल्या आहेत. मात्र, यावर कदम म्हणाले की, या संपूर्ण प्रकरणात सुमारे १७ लाख रुपयांची मोठी रक्कम गुंतलेली आहे. विशेष म्हणजे, पुणे महानगरपालिकेशी संबंधित असणाऱ्या एकाच ठराविक व्यक्तीचे नाव या सर्व प्रकरणांमध्ये वारंवार समोर येत आहे. त्यामुळे तक्रारदारांनी तडजोड करून तक्रार मागे घेतली असली, तरीही शासन या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून या मुख्य संशयिताची 'सुमोटो' चौकशी करेल. गृह विभागामार्फत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT