PMC Pune News
PMC Pune News Sarkarnama
पुणे

PMC News : नोकरीची मोठी संधी; 100 कनिष्ठ अभियंत्यांची होणार भरती, महापालिकेने 'ती' अटच हटवली

ब्रिजमोहन पाटील : सरकारनामा ब्यूरो

Pune Latest News : महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता भरतीसाठी अनिवार्य असलेली तीन वर्षाची अनुभवाची अट सेवा प्रवेश नियमावलीतून 'बडतर्फ' करण्यात आली आहे. यापुढे अनुभवी तसेच फ्रेशर अभियंत्यांना भरतीसाठी अर्ज करता येईल आणि लेखी परिक्षेतील गुणवत्ता यादीतील क्रमांकावर नोकरी सुद्धा मिळवता येणार आहे.

अनुभव सिद्ध करण्यासाठी कागदपत्रांचा जुगाड करण्याची गरज पडणार नाही. यासंदर्भातील आदेश राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने काढला आहे. दरम्यान, कनिष्ठ अभियंत्यांच्या 100 जागांसाठी पुढच्या 10 दिवसांत जाहिरात प्रसिद्ध केली जाईल, असे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.

पुणे महापालिकेने 2014 मध्ये सेवा प्रवेश नियमावली तयार केली. त्यामध्ये कनिष्ठ अभियंता पदासाठी 3 वर्षाचा अनुभव अनिवार्य असल्याची अट टाकण्यात आली होती. पण ही अट उमेदवारांसाठी तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरली. गेल्यावर्षी 135 कनिष्ठ अभियंता पदाची भरती प्रक्रिया राबविण्यात आली. लेखी परिक्षेनंतर कागदपत्र पडताळणीसाठी बोलविण्यात आलेल्या उमेदवारांना तीन वर्षाचा अनुभव सिद्ध करणारी कागदपत्र सादर करणे आवश्‍यक होते. यामध्ये प्राप्तिकर विवरणपत्र, भविष्य निर्वाह निधीची कागदपत्रे, बँकेचे स्टेटमेंट, सनदी लेखापालांचे प्रमाणपत्र आदी पुरावे सादर करणे आवश्यक होते. ज्यांच्याकडे तीन वर्षाचा अनुभव नव्हता, त्यांनी बनावट कागदपत्र सादर केली होती. याप्रकरणी तिघांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. तर कारवाईच्या भीतीने अनेकांनी नोकरी स्वीकारली नाही. अनुभवाच्या अटीमुळे आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याने महापालिकेने ही अट काढून टाकावी यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार त्यास नऊ महिन्यानंतर मान्यता मिळाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

... म्हणून जाहिरात लांबवली

महापालिकेला कनिष्ठ अभियंत्यांची गरज आहे. 135 जणांची भरती केल्यानंतर आणखी 100 जागा भरल्या जाणार आहेत. पण अनुभवाची अट रद्द झाल्यानंतरच यासंदर्भातील जाहिरात काढली जाईल, असे प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले होते. महापालिकेने फेब्रुवारी 2023 मध्ये राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवला होता, त्यास 14 डिसेंबर रोजी मान्यता देऊन शासन निर्णय काढण्यात आला आहे. त्यामुळे आता जाहिरात काढली जाईल.

edited by sachin fulpagare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT