Pune News : पुणे महापालिकेत तीन अतिरिक्त असतानाही आता महापालिकेच्या सेवेतील काही अधिकाऱ्यांना या पदाच्या खुर्चीवर डोळा ठेवला आहे. पुढच्या काही दिवसांत 'आयएएस' अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याच्या शक्यतेने महापालिकेतील मुख्य अभियंता (प्रकल्प) श्रीनिवास बोनाला यांच्यासह विद्युत खात्याचे प्रमुख श्रीनिवास कंदुल यांच्यासह मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर हेही अतिरिक्त आयुक्तपदाच्या स्पर्धेत आहेत.
सत्ताधारी भाजप नेत्यांची जवळकीता दाखवून कंदुल यांनी अतिरिक्त आयुक्त होण्यासाठी फिल्डिंग लावल्याचे समजते. यातच कंदुल यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचीही भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. 'भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस' अशी थेट युती करून महापालिकेतील महत्त्वाच्या खुर्चीत बसण्याची तयारीही कंदुल यांनी केल्याचे दिसून येत आहे
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दुसऱ्या बाजूला कोणत्या नेत्यांच्या गाठीभेटी न घेता, सहजरित्या पद मिळाले; तर ते घेण्याची बोनाला यांची मन:स्थिती आहे. महापालिकेच्या तिजोरीची जबाबदारी असलेल्या कळसकर यांनाही या पदाची ओढ लागली आहे. बोनाला, कंदुल आणि कळसकर हे तिघेही महापालिकेतील महत्त्वाच्या पदांवर असून, ते सीनिअर आहेत.
त्यामुळे यापदासाठी त्यांची नार्वे चर्चेत राहू शकतात. दुसरीकडे, अतिरिक्त आयुक्तपदावर शंभर टक्के संधी मिळण्याची शक्यता असून, शहर अभियंता प्रशांत वाघमारे हे यापदापासून लांब राहत आहेत.
महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने नुकतीच अतिरिक्त आयुक्तपदासाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या अधिकाऱ्यांची यादी राज्य सरकारला पाठवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अतिरिक्त आयुक्त पदाचे स्वप्न महापालिकेतील अधिकाऱ्यांना दिसू लागले आहे . यामधून कुणीतरी एक निवडला जाणार आहे, जो निर्णय राज्य सरकार घेणार आहे.
राज्य सरकारने महापालिकेत असलेल्या 3 अतिरिक्त आयुक्तपदापैकी एक पद महापालिका अधिकाऱ्यांसाठी रिक्त ठेवले आहे. त्यानुसार महापालिकेच्या अधिकाऱ्यातील पहिले अतिरिक्त आयुक्त होण्याचा मान सुरेश जगताप यांना मिळाला. त्यानंतर ज्ञानेश्वर मोळक, विलास कानडे यांना संधी मिळाली होती.
कानडे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी आपली वर्णी लागावी, यासाठी महापालिकेतील अधिकारी प्रयत्न करत असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकास ढाकणे यांना आणून बसवले. त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांच्या हातून हे पद निसटले होते.
पालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने तयार केलेल्या यादीनुसार यामध्ये सध्या वाघमारे, कळसकर, बोनाला, कंदुल यांची नावे पुढे पाठवण्यात आली आहेत. त्यामुळे या चार अधिकाऱ्यांपैकी कोणाची वर्णी लागणार हे राज्य सरकारच्या हातात असल्याने हे सर्वच अधिकारी महापालिका वर्तुळात चर्चेत आहेत.
या स्पर्धेत कोण बाजी मारणार याकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सध्या महापालिकेत कुणाल खेमणार, रवींद्र बिनवडे, विकास ढाकणे हे अतिरिक्त आयुक्त आहेत.