Pune Mahapalika News : पुणे महापालिकेच्या निवडणुकीत एबी फॉर्म वाटप करताना झालेल्या गोंधळामुळे एकाच प्रभागात चौरंगी, पंचरंगी निवडणूक होण्याची शक्यता आहे. मतांमध्ये मोठ्या प्रमाणात विभागणी होण्याची शक्यता असल्याने उमेदवारांना एकेका मतासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. यात देखील 21 प्रभागांनी सर्वपक्षीयांची धाकधूक वाढवली आहे.
यंदा नवीन प्रभागरचना असली तरी 2017 मधील निकालाची तुलना केल्यास 21 प्रभागांत एक हजारपेक्षा कमी मताने निवडून येणाऱ्या उमेदवारांची संख्या 21 आहे. अनेकांचा निकाल हा शेवटच्या फेरीत लागला आहे. अशा प्रभागांवर सर्वच राजकीय पक्षांनी लक्ष केंद्रित केले आहे. काही ठिकाणी उमेदवार बदलला, काहींना पक्षांतर केले तर काहींना उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे अशा प्रभागांत 2026 च्या निवडणुकीत काय निकाल लागणार? याची उत्सुकता आहे.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी 2017 प्रमाणे 2026 साठीही चार सदस्यांचा प्रभाग तयार करण्यात आला आहे. पण महापालिकेत 32 गावे समाविष्ट झाल्याने नव्याने प्रभागरचना करावी लागली आहे. यामध्ये 41 प्रभागांत 165 नगरसेवक निवडून येणार आहेत. 2017 आणि 2026 च्या प्रभागरचनेशी तुलना केल्यास सरासरी 80 टक्के रचना सारखी आहे तर प्रत्येक प्रभागाची रचना पाहिल्यास काही प्रभागांत सरासरी 90 टक्के प्रभाग सारखे राहिलेले आहेत. नवीन समाविष्ट गावांमध्ये नवीन प्रभाग तयार झाल्याने एक-दोन ठिकाणी जुन्या प्रभागाचे अस्तित्व नष्ट झाले आहे. त्यामुळे या नव्या प्रभागांमधून एक हजारपेक्षा कमी मतांनी निवडून आलेले माजी नगरसेवक निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
2017 मध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसेसह अन्य पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढवलेली होती. गेल्या नऊ वर्षांत अनेक राजकीय स्थितंतरे झाली आहेत. त्यामुळे 2026 च्या निवडणुकीत काही प्रमाणात समीकरणे बदललेली असतील. या निवडणुकीत भाजप, शिवसेना व दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र निवडणूक लढवत आहेत. तर काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, मनसे एकत्रित निवडणूक लढवत आहेत. हे तीन पक्ष एकत्रित आल्याने कमी-जास्त प्रमाणात त्याचा फायदा कोणाला व फटका कोणाला बसणार? हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी 165 प्रभागांतून तीन हजार 41 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. युती तुटल्याने भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष एकत्र लढत आहेत. तर काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे हे पक्ष महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यासोबत वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पक्षाने त्यांचे उमेदवार उभे केले आहेत. भाजपने 125 जागांचे लक्ष्य ठेवले आहे. पण अशा धोक्याच्या प्रभागात उमेदवार पडल्यास संख्याबळ कमी होऊ शकते आणि विरोधकांचे संख्याबळ वाढू शकते. त्यामुळे येणारी निवडणूक चुरशीची होणार असून, धावपळीमुळे उमेदवारांचा घाम निघणार आहे.
राज्यात महायुतीचे सरकार असल्याने यावेळीच्या प्रभागरचनेवर भाजपचा प्रभाव आहे. त्यांच्या सोईनुसार प्रभाग रचना केली आहे, असा आरोप विरोधकांकडून कायम केला जातो. 2026 च्या निवडणुकीसाठी प्रभागरचना करताना 2017 मध्ये ज्या प्रभागात काठावर विजय मिळाला किंवा पराभव झाला तेथे धोका लक्षात घेऊन रचनेत महत्त्वाचे बदल केले आहेत. काही ठिकाणी उमेदवारांनी पक्ष बदलून भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला आहे. तर काहींना पुन्हा एकदा उमेदवारी मिळाली आहे. काहींचे तिकीट नाकारून नव्या उमेदवाराला संधी दिली आहे. त्यामुळे या प्रभागांमध्ये काय निकाल लागणार? याकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.