Pune MahaPalika News : सध्या राजकीय वर्तुळात स्वीकृत नगरसेवक पदाची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली असल्याचे पाहायला मिळत आहे. स्वीकृत नगरसेवक पदाच्या माध्यमातून मागच्या दरवाजाने महापालिकेत जाण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. महापालिका निवडणुकीदरम्यान पुण्यातून भाजपकडून निवडणूक लढण्यासाठी तब्बल अडीच हजार जण इच्छुक होते. सर्वांना तिकीट देणं शक्य नसल्याने बहुतांश जणांना स्थानिक नेत्यांनी ‘तुमची स्वीकृत पदावर वर्णी लावून देऊ,’ असे आश्वासन दिले गेले असल्याचे सांगितले जात आहे.
त्यामुळे महापालिका निवडणूक लढण्यासाठी संधी न मिळालेले अनेक जण सध्या स्वीकृत नगरसेवक पदाची माळ आपल्या गळ्यात पडावी यासाठी प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे सध्या इच्छुकांचा महापूर आल्याचे पाहायला मिळत आहे.
पुणे महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या 10 जागांसाठी तब्बल 400 हून अधिक इच्छुक असल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये सर्वाधिक इच्छुक हे भाजपकडे असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपकडून महापालिकेमध्ये 7 स्वीकृत नगरसेवक निवडले जाणार आहेत.
या सात स्वीकृत नगरसेवकांच्या जागांसाठी तब्बल 300 हून अधिक जण फिल्डिंग लावून बसले आहेत. त्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस दोन स्वीकृत नगरसेवक निवडणार असून, त्यासाठी तब्बल 75 जणांनी अर्ज केला असल्याचे समोर आले आहे. काँग्रेसच्या एका जागेसाठी तब्बल 20 जण इच्छुक असल्याचे देखील पाहायला मिळत आहे. या वाढलेल्या इच्छुकांच्या संख्येमुळे स्थानिक नेते मात्र पुरते वैतागून गेले आहेत.
महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी सर्व पक्ष नेत्यांना पत्र देऊन स्वीकृत सदस्य नेमणुकीसाठी नावे देण्यास सांगितले आहे. त्यासाठी 9 मार्च ही तारीख निश्चित करण्यात आली असून, दुपारी 1 वाजेपर्यंत ही नावे द्यावी लागणार आहेत. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांतील इच्छुकांची गडबड वाढली आहे.
त्यासाठी इच्छुकांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे जोरदार लॉबिंग सुरू केले आहे. काही जण थेट राज्यातील वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधून स्थानिक नेत्यांना आपले नाव लावून धरण्यासाठी फोन करण्याची विनंती करत आहेत. त्यानुसार स्थानिक नेत्यांना राज्य पातळीवरून अशा प्रकारचे फोन देखील येताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे इच्छुकांच्या शिफारशी आणि लॉबिंगमुळे सर्वच नेते वैतागून गेले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे काँग्रेसकडून 6 तारखेला नाव फायनल करण्याबाबतची बैठक घेण्यात येणार असून, भाजप देखील दोन दिवसांत याबाबतची बैठक घेऊन अंतिम निर्णय घेणार असल्याचे समोर आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.