ब्रिजमोहन पाटील
Pune News, 24 Aug : पुणे महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना अखेर जाहीर झाली आहे. या प्रभाग रचनेत काही ठिकाणी जैसे थे परिस्थिती आहे तर काही ठिकणी मोठे बदल करण्यात झाले आहेत. या रचनेत 38 क्रमांकाचा आंबेगाव-कात्रजचा प्रभाग 5 सदस्यांचा करण्यात आला आहे.
तर तीन सदस्यांचे 3 प्रभाग रद्द करून ते 4 सदस्यांचे करण्यात आले आहेत. या प्रभागांचा परिणाम थेट 64 नगरसेवकांवर होणार आहे. तर शिवसेनेच्या या चालीमुळे भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी 4 सदस्यांचे 40 प्रभाग तर 5 सदस्यांचा एक प्रभाग अशा 41 प्रभागांतून 165 नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. प्रशासनाकडून प्रभाग रचना तयार करताना शासनाच्या निकषानुसार 39 प्रभाग चार सदस्यांचे आणि 3 प्रभाग तीन सदस्यांचे असे 42 प्रभाग केले होते.
यामध्ये 5 सदस्यांचा प्रभाग करण्यात आला नव्हता. हे 3 सदस्यांचे प्रभाग पुणे कॅंटोन्मेंट, पर्वती या मतदारसंघातील होते. तर सोमवारपेठ-रास्तापेठ-मंगळवार पेठ, सॅलिसबरी पार्क आणि बालाजीनगर हे 3 प्रभाग सत्ताधारी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेससाठी फायदेशीर ठरणार होते. ही प्रभागरचना पालिकेने सरकारकडे मंजुरीसाठी पाठवली होती.
तर ही प्रभाग रचना करताना प्रशासना आणि भाजपने महायुतीतील शिवसेना, राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीला विश्वासात न घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नगरविकास खात्याकडे प्रारूप प्रभागरचना सादर झाल्यानंतर त्यामध्ये बदल करण्यात आले.
3 सदस्यांचे तीन प्रभाग करणे नियमात बसत नसल्यामुळे पाच सदस्यांचा एक प्रभाग केला जाईल, असा निर्णय शिंदेंच्या खात्याने घेतला. तीन सदस्यांचे किती प्रभाग करता येतील? याबाबतची स्पष्टता नसल्यामुळे या मुद्द्यावर हरकत घेत नगरविकास विभागाने तीन सदस्यांचे 3 प्रभाग रद्द केले आणि त्याऐवजी 5 सदस्यांचा एका प्रभाग केला. पाच सदस्यांचा प्रभाग तयार केल्यामुळे 16 प्रभागांच्या हद्दी बदलल्या आहेत.
यामध्ये, लोहगाव-धानोरी, फुलेनगर-नागपूर चाळ, येरवडा-गांधीनगर, पुणे स्टेशन-जयजवान नगर, कमला नेहरू रुग्णालय-रास्तापेठ, रविवार पेठ-नाना पेठ, कासेवाडी-डायस प्लॉट, गुरुवार पेठ-घोरपडे पेठ, मुकुंदनगर-सॅलिसबरी पार्क, कोंढवा खुर्द-कौसरबाग, बिबवेवाडी-महेश सोसायटी, अप्पर-इंदिरानगर, कोंढवा बुद्रूक- येवलेवाडी, वानवडी-साळुंखे विहार, नऱ्हे-वडगाव बुद्रूक, कोरेगाव पार्क - मुंढवा या प्रभागांचा यात समावेश आहे. या हद्दीच्या बदलामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
तीन सदस्यांचे 3 प्रभाग करताना भाजपने माजी सभागृहनेते गणेश बिडकर, श्रीनाथ भिमाले यांच्या प्रभागांच्या हद्दी बदलल्यामुळे बिडकर यांचा भाग माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या कसबा पेठ भागाला जोडला गेला आहे. त्यामुळे महायुतीतील हे राजकीय विरोधक 2017 प्रमाणे पुन्हा एकदा एकमेकांच्या समोर येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या बदलाचा सर्वाधिक फटका माजी महापौर दत्ता धनकवडे यांना बसला आहे. प्रशासनाने शासनाकडे पाठवलेल्या प्रारूप प्रभागरचनेत बालाजीनगर व अन्य काही भाग तीन सदस्यांचा केला होता. पण पाच सदस्यांचा प्रभाग करताना धनकवडे यांच्या प्रभागाचे अस्तित्वच संपले आहे. त्यांचा हक्काचा भाग 5 प्रभागांत विभागला गेला आहे.
तर काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांचा प्रभाव असलेला सोमवार पेठेचा भाग प्रभाग 13 मधून वगळला आहे. येरवड्यातील काही भाग या प्रभागाला जोडला गेल्याने ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय भोसले यांचा क्रीम भाग त्यांच्या प्रभाग क्रमांक 6 मधून वगळला गेला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.